हर्षवर्धन पाटलांवर टीका, जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला खडसावलं

आपण मित्रपक्षातील नेत्यावर (Indapur Harshavardhan Patil) टीका करता ही चुकीची बाब असल्याचं त्यांनी खडसावलं. इंदापूरच्या जागेबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगून होईल त्या निर्णयानुसार प्रामाणिक काम करावं, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

हर्षवर्धन पाटलांवर टीका, जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला खडसावलं

बारामती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत इंदापूर मतदारसंघात मात्र नेहमीप्रमाणे धुसफूस सुरुच आहे. बारामती तालुक्यातील कारखान्याकडून 3400 रुपये दर दिला. मात्र इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील (Indapur Harshavardhan Patil) यांच्या कारखान्याने 2100 रुपये दर दिल्याचं सांगत त्यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडी धर्माची आठवण करुन दिली. आपण मित्रपक्षातील नेत्यावर (Indapur Harshavardhan Patil) टीका करता ही चुकीची बाब असल्याचं त्यांनी खडसावलं. इंदापूरच्या जागेबाबत वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगून होईल त्या निर्णयानुसार प्रामाणिक काम करावं, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा दाखल झाली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ऊसाच्या दरावरुन हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करत इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडेच ठेवण्याची मागणी केली.

गारटकर यांच्या भाषणाचा धागा पकडत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना आघाडी धर्माची आठवण करुन दिली. मित्र पक्षाच्या नेत्यांवर आपण टीका करणं चुकीचं आहे. आज देशात आणि राज्यात भाजप-शिवसेनेने काय कारभार चालवलाय आणि तुम्ही काय करताय, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दुसरीकडे इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडेच ठेवावी या मागणीवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, राज्यात आपण काँग्रेस आणि मित्रपक्षांशी आघाडी केली आहे. त्यानुसार जागा वाटपाबाबत योग्य निर्णय घेतले जातील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम बाळगा, असं त्यांनी स्पष्ट केलं. जे शरद पवार यांना मानतात ते वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य करुन काम करतील असंही सांगायला ते विसरले नाहीत.

सभेत राष्ट्रवादीचे नेते इंदापूरच्या जागेबाबत निर्णय जाहीर करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात निर्णय जाहीर होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आघाडी धर्माचं पालन करण्यासह पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य करण्याची सूचनाच उपस्थित कार्यकर्त्यांना केली. त्यामुळे इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला मिळते याबाबत उत्सुकता अधिकच ताणली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *