कल्याण-डोंबिवलीत साडी वॉर, भाजप-काँग्रेस आमनेसामने; पुढील 24 तासात काय घडणार?

कल्याण-डोंबिवलीत पंतप्रधान मोदींच्या फोटोला साडी नेसवून पोस्ट केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस कार्यकर्त्याने केलेल्या या कृत्याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. काँग्रेसने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे,

कल्याण-डोंबिवलीत साडी वॉर, भाजप-काँग्रेस आमनेसामने; पुढील 24 तासात काय घडणार?
| Updated on: Sep 25, 2025 | 5:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला साडी नेसवून त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कृत्याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एका नेत्याला भररस्त्यात साडी नेसवल्याने दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत, २४ तासांत गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे, तर भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या वादामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो एडिट करून त्यांना साडी परिधान केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. ही पोस्ट भाजप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताच त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त झाला. याचा निषेध म्हणून संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पगारे यांना भररस्त्यात जबरदस्ती साडी नेसवून त्यांचा निषेध केला. या घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक उग्र झाला आहे.

काँग्रेस आक्रमक, भाजप भूमिकेवर ठाम

या घटनेनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, २४ तासांचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने काँग्रेसने आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी काँग्रेसला उघडपणे प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही जे केले ते कमीच आहे. यापुढे जर आमच्या नेत्यांबद्दल असे कृत्य झाले, तर याच पद्धतीने उत्तर देऊ. पंतप्रधानांसाठी आम्ही गुन्हे घ्यायलाही तयार आहोत, असे ठामपणे सांगत त्यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

या साडी वादामुळे कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. तसेच काँग्रेसकडून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. परिस्थिती पाहता, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका पाहता, हा वाद लवकर मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.