KDMC मध्ये भाजपने नगरसेवक फोडले, आता शिंदे गटाने उचलले मोठे पाऊल, थेट चेकमेट देणार?

कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. भाजपने शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याने, शिवसेनेने तातडीने 'डॅमेज कंट्रोल' करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

KDMC मध्ये भाजपने नगरसेवक फोडले, आता शिंदे गटाने उचलले मोठे पाऊल, थेट चेकमेट देणार?
eknath shinde
| Updated on: Nov 20, 2025 | 11:29 AM

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील राजकीय कुरघोडी शिगेला पोहोचली आहे. राज्यात दोन्ही पक्ष महायुतीमध्ये असले तरी, स्थानिक पातळीवर आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना धक्के दिले जात आहेत. कल्याण पूर्वेत भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेतल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. आता हाच धक्का भरून काढण्यासाठी शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने मोठे डॅमेज कंट्रोल ऑपरेशन सुरू केले आहे.

शिवसेनेने कल्याणमधील सर्व पदाधिकाऱ्यांची एक मोठी बैठक घेतली. या बैठकीत सुमारे शेकडो पदाधिकाऱ्यांच्या पद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या सुमारे ७०० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले की यापूर्वी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती. पण काही जण अनुपस्थित होते. तसेच नवीन पॅनल पद्धतीने झालेल्या वाढीनुसार आज कल्याण पूर्वमध्ये पदांचे वाटप करण्यात आले आहे.

सर्व जण जोमाने कामाला लागले आहेत

विशेष म्हणजे महिला आघाडीच्या जवळपास ७०० पदाधिकाऱ्यांना पद देण्यात आले आहे. ज्यामुळे संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. निवडणूक म्हणून कार्यकर्ते कधी काम करत नाहीत, ते नेहमीच काम करत असतात. निवडणूक जाहीर झाल्याने सर्व जण जोमाने कामाला लागलेले आहेत, असे गोपाळ लांडगे म्हणाले.

जास्त जागा निवडून येतील

या निवडणुकीत निश्चितपणे जेवढ्या जागा होत्या. त्यापेक्षा जास्त जागा निवडून येतील, असा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात अनेक सुधारणा आणि कामे प्रगतीपथावर आहेत. लोकांना विकास हवा आहे, त्यामुळे शिवसेनेला यश मिळेल, असेही गोपाळ लांडगे यांनी सांगितले. एकंदरीत, भाजपने फोडलेल्या नगरसेवकांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शिवसेनेने तातडीने पावलं उचलली आहेत. तसेच कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी अधिक प्रेरित करण्यासाठी शिवसेनेने तातडीने संघटन बळकट करत निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.