अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला, अजित पवारांच्या विनंतीनंतर कर्नाटक सरकारचा निर्णय

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला धरणातून विसर्ग वाढण्याची मागणी केली होती.

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला, अजित पवारांच्या विनंतीनंतर कर्नाटक सरकारचा निर्णय
| Updated on: Jul 25, 2024 | 7:40 PM

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीनंतर कर्नाटक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अलमट्टी धरणातील निसर्ग 75 हजार क्युसेक्सने वाढवण्यात आला आहे. आता अलमट्टी धरणातून 3 लाख क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरसदृश्य परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक प्रशासनाशी दुपारी चर्चा केली होती. अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर कर्नाटक प्रशासनाने विसर्ग वाढवला आहे. या आधी 2 लाख 75 हजार क्युसेक्सने सुरु होता विसर्ग.

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेतली आहे. पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीबाबत दोघांशी चर्चा केली. अलमट्टी धरणातून पाणी नियंत्रणात सोडण्याची त्यांनी विनंती केली. डी के शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा  मोठा फटका बसला आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे. दुपारपर्यंत स्थिर असलेली पाणी पातळी पुन्हा एक इंचाने वाढली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फूट चार इंचांवर पोहोचली आहे. शहर आणि परिसरात दिवसभर पावसाचा जोर ओसरला तर धरण क्षेत्रातही अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून देखील ३ लाखाहून अधिक क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

सांगलीतील वारणा नदीला पूर

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीला पूर आला आहे. या पुरामधून आता मगरी पाण्याच्या बाहेर पडत आहे. अशीच एक मगर चिकुर्डे येथील भोसले शिराळकर वस्तीत दिसली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.