IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो, कोण जिंकणार?
India vs South Africa 4th T20i Preview : टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत मजबूत स्थिती आहे. तर दक्षिण आफ्रिका बॅकफुटवर आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी चौथा सामना हा मालिकेच्या बरोबरीचा आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेच्या दृष्टीने चौथा सामना जिंकण्याचं आव्हान आहे.

टीम इंडियाला कसोटी मालिकेत पराभूत करुन भारत दौऱ्याची दणक्यात सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर टी 20I सीरिजमध्ये टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिका या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला लखनौतील एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडियाला या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. मात्र पाहुण्या दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने या विजयासह कमबॅक केलं आणि मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. त्यामुळे आता टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेला मालिका गमवायची नसेल तर चौथ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. अशात दक्षिण आफ्रिका या आर या पार अशा स्थितीत टीम इंडियासमोर कशी कामगिरी करते याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने चौथ्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. तसेच टीम इंडियाचा हा आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी सातवा सामना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठीही हा सामना महत्त्वाचा आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेवर जास्त दडपण आहे. त्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पुनरागमन केलं. त्यामुळे भारताचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारतासमोर कस लागणार हे निश्चित आहे.
टीम इंडियाची एकाना स्टेडियममधील कामगिरी
दरम्यान टीम इंडिया आतापर्यंत एकाना स्टेडियममध्ये अजिंक्य आहे. टीम इंडियाने या स्टेडियममध्ये 3 टी 20i सामने खेळले आहेत. टीम इंडियाने तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या मैदानात आपला पहिला आणि टी 20i सामना हा नोव्हेंबर 2018 साली खेळला होता. भारताने तेव्हा वेस्टइंडिजला पराभूत केलं होतं.
भारताने त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेवर मात केली होती. तर भारताने या मैदानात अखेरचा टी 20i सामना हा जानेवारी 2023 मध्ये खेळला होता. भारताने त्या सामन्यात न्यूझीलंडला लोळवलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया या मैदानातील आपल्या चौथ्या टी 20i सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजयी चौकार लगावणार का? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
