Ketan Agarwal Case : फेक Instagram अकाउंट ते लोहगडावरचा सापळा; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात काय-काय उघड?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांनी मिळून कट रचला. लोहगडावर केतनला ढकलून मारण्यापूर्वी त्यांनी ChatGPT वापरून नियोजन केले. बनावट इन्स्टाग्राम अकाउंटने त्याला बोलावले. सुरुवातीला अपंग करण्याचा प्रयत्न फसल्यावर त्यांनी हत्येचा कट अंमलात आणला, अशी माहिती समोर आली आहे.

दिपक कापरे, प्रतिनिधी : पुण्यातील नामांकित व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder) याचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला. जून महिन्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सगळेच हादरले. मात्र लोहगडावरून तो पाय घसरून पडला नाही तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनीच त्याला ढकलून त्याची हत्या केल्याचं समोर आलं आणि सगळेच हादरले. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अनेक नवनवे खुलासे झाले . सिया-चेतनाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक झाली. सिया आणि चेतन चौधरीचा मित्र रितेश हांगे यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती. याप्रकरणाचा तपास करताना अखेर पोलिसांनी रितेशलाही अटक केली आणि या घटनेतील आरोपींची संख्या तीन झाली.
केतन अग्रवाल हत्येच्या केसमध्ये 5053 पानांचे दोषारोप पत्र असून प्रत्यक्षदर्शी 5 साक्षीदार असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आणखी बरीच धक्कादायक माहिती समोर आली असून सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांनी मिळून केतनला संपवण्याचा प्लान कसा रचला, त्यांनी काय-काय केलं याचीही माहिती उघड झाली आहे.,
अपंग करण्याचा होता प्लान
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, केतन अग्रवाल हत्येच्या केसमध्ये दोषारोप पत्रात 3 आरोपी आहेत ते म्हणजे सिया, चेतन आणि रितेश हांगे. त्या तिघांनी मिळून सुरूवातीला केतनला अपंग करण्याचा प्रयत्न केला होता. परराज्यातील व्यक्तीकडून केतनला गंभीर दुखापत करायचा कट त्या तिघांनी आखला होता. यासंदर्भात त्या तिघांचा परराज्यातील अनेक व्यक्तीशी संपर्क देखील झाला होता. मात्र ती व्यक्ती पोलिसांना सापडली तर अडचण होऊ शकते, असा विचार करून अखेर तिघांनी हा प्लान बदलला. यामधील एक व्यक्ती या प्रकरणात साक्षीदार झाला, अशी माहिती समोर आली आहे.
लोणावळ्यातील अनेक डोंगराची केली रेकी
त्यानंतर आपणच केतनला मारून टाकू असं त्यांनी ठरवलं, त्यासाठी त्यांनी भरपूर तयारी केली. त्यासाठी तिघांनी यासंदर्भातील भरपूर सिनेमे पाहिले, एवढंच नव्हे तर चॅटजीपीटीचाही उपयोग केला, अशी माहिती समोर आली. एवढंच नव्हे तर त्यांनी मेघालयातील सोनम रघुवंशी केसचाही अभ्यास केला होता. 29 मे रोजी सिया आणि चेतन हे लोणावळ्यात फिरले, त्यांनी टायगर पॉईंट गाठलं आणि तिथली रेकी केली तेव्हा टायगर पॉईंटला cctv नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी
लोणावळ्यातील अनेक डोंगराची रेकी देखील केली अशी माहिती समोर आली आहे.
लोहगड कसा निवडला ?
केतनच्या हत्येसाठी त्यांनी लोहगडाची निवड कशी केली तेही आता उघड झालं आहे. गेल्या वर्षी, मार्च 2025 मध्ये लोहगाडावर एका महिलेचा मृत्यू झालेला, त्यामुळे तिथे प्लान अमलात आणला तर केतन सेल्फी घेताना पडला असं लोकांना वाटेल, असा विचार सिया, चेतन आणि रितेश यांनी केला. त्यानंतर सियाने 4 जून रोजी केतनकडे लोहगडावर जाण्याचा हट्ट केला. प्री-वेडिंगसाठी बालीला जाण्यापूर्वी तिला केतनचा काटा काढायचा होता. मात्र तेव्हा ते शक्य झालं नाही. अखेर 6 जून रोजी ते प्री वेडिंग शूटसाठी बालीला निघाले, मात्र एअरपोर्टला जाताना खालापूर येथे कॅफेत थांबल्यावर सियाने केतनचा पासपोर्ट वॉशरूममध्ये फाडून फेकून दिला, त्यामुळे ते बालीला जाऊ शकले नाहीत . त्यानंतर 14 जूनला सिया आणि केतन पुन्हा लोहगडावर गेले. तिथे सियाने केतन अग्रवालला ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र तो पडला नाही. तेव्हा मग सियाने साप आला, साप आला असा बनाव केला. त्या दिवशी केतनला संपवण्यात तिला अपयश मिळालं.
मैत्रिणीचं फेक अकाऊंट बनवून केतनला लोहगडावर येण्याची घातली गळ
त्यानंतर सिया, चेतन आणि रितेश या तिघांनी मिळून माही नावाच्या मुलीचं फेक इन्स्टाग्राम अकाऊंट बनवलं. 18 जूनला त्यांनी माहीच्या अकाऊंटवरून केतनशी संपर्क साधला, मी सियाची मैत्रीण आहे, तुम्ही तिला घेऊन लोहगडावर या. आपण सियाचा वाढदिवस साजरा करू आणि तिला सरप्राईज देऊ, असं त्यांनी केतनला सांगितलं. हा सगळा प्लान रितेश हांगे याने केला.
चेतन चौधरी हा exit रूटने गडावर गेला. सिया ही केतनसोबत होती. तिने चेतनला वर जाण्यास खुणावलं. त्यानंतर चेतन चौधरी हा गडावरील मंदिरात जाऊन बसला. केतन आणि सिया फिरत फिरत तिथे पोहोचले. अखेर केतनचं लक्ष नसताना सियाने पाठीमागून त्याच्या खांद्याला आणि चेतनने पायाला धक्का दिला. एवढंच नव्हे तर चेतनने लाथ मारून केतनला खाली पाडलं. शेकडो फूट दरीत कोसळल्यामुळे केतनचा मृत्यू झाला. सिया व चेतन यांचा मित्र रितेश हांगे याने हा सगळ कट रचला अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
मार्चपासूनच केलं प्लानिंग
केतनला मारल्यानंतर त्यांनी माही नावंचं ते अकाऊंट डिलीट केलं. केतनला संपवण्यासाठी त्यांनी मार्च 2026 पासून कट रचण्यास सुरुवात केली . मर्डर सिनेमा पाहिला, एवढंच नव्हे तर पोलिसांपासून वाचायचं कसं या संदर्भातील अनेक पॉडकास्टही त्यांनी ऐकले होते.