
Nashik Kumbh Mela : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. 13 आखाड्याच्या प्रमुख साधू महंतांच्या बैठकीत मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीतच मुख्यमंत्री आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करणार आहेत. कुंभमेळ्यातील शाही स्नानस आता अमृत स्नान संबोधित करावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली आहे.
कुंभमेळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज साधू महंतांची पहिली बैठक नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीत तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहे. या बैठकीसाठी साधू महंतांची आसन व्यवस्था जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला 7 शैव आखड्यांचे 14 महंत बसणार आहेत. तसेच डाव्या बाजूला 3 वैष्णव आखड्यांचे 6 महंत बसणार आहेत. त्यांच्या बाजूला पुन्हा 3 शैव आखड्यांचे 6 महंत बसणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष वैष्णव आखाडांच्या महंतांच्या बाजूला बसतील. साधू महंतांच्या मागे पाच प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी बसणार आहे. साधू महंतांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री ‘अमृत स्नानाच्या’ तारखा जाहीर करणार आहे.
महंत राजेंद्र दास महाराज यांनी बैठकीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्याही मांडल्या आहेत. ते म्हणाले, सिंहस्थासाठी किमान हजार ते पंधराशे एकर जागा आरक्षित करावी. गेल्या वेळी जागा आरक्षित करण्याचे आश्वासन देऊन देखील पाळण्यात आले नाही. यावेळी मोठ्या प्रमाणात कुंभला गर्दी होणार आहे. त्यामुळे जागा आरक्षित करण्याची प्रमुख मागणी आमची आहे.
कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, असेही महंत राजेंद्र दास महाराज यांनी म्हटले. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, शाही स्नान शब्द मुगलांशी संबंधित आहे. यामुळे या स्नानास आता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, ही देखील आमची मागणी असणार आहे. गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर कठोर पावले सरकारने उचलावे, कुंभमेळा प्राधिकरण घोषित करावे, अशी मागणीही त्यांनी केली.