हेच ते किल्ले, ज्याबाबतचा निर्णय घेऊन सरकारने नवा वाद निर्माण केला

| Updated on: Sep 06, 2019 | 9:27 PM

किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यात ज्या 22 किल्ल्यांचा विकास केला जाणार होता, त्यापैकी काही किल्ल्यांची नावं टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत.

हेच ते किल्ले, ज्याबाबतचा निर्णय घेऊन सरकारने नवा वाद निर्माण केला
Follow us on

मुंबई : पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन (Forts of Maharashtra) झालेल्या टीकेनंतर पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं. पहिल्या टप्प्यात ज्या 22 किल्ल्यांचा विकास केला जाणार होता, त्यापैकी काही किल्ल्यांची नावं (Forts list) टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहेत.

किल्ल्यांची यादी

  • नागरधन – गोंड राजांकडून बांधकाम
  • कंधार- राष्ट्रकूट राजांकडून बांधकाम
  • नळदुर्ग- नळ राजांकडून बांधकाम
  • लळिंग- फारुखी राजांकडून बांधकाम
  • कोरिगड- निर्माता अज्ञात
  • साल्हेर- शिवरायांनी जिंकलेला किल्ला
  • घोडबंदर- पोर्तुगिजांकडून बांधकाम
  • पारोळा- झाशीच्या राणींच्या वडिलांकडून बांधकाम

पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण

“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.

वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये”, असं पर्यटन विभागाकडून सांगण्यात आलं.