बीडजवळ अपघातानंतर गाडीने पेट घेतला, महंत तुकाराम महाराजांचा मृत्यू

  • महेंद्र कुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 21:51 PM, 11 May 2019

बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी येथील ओव्हरब्रीजच्या खालील बाजूच्या सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं. कार चालकासह आतील इतर प्रवासी तात्काळ बाहेर पडले. पण या घटनेत जखमी झालेल्या महंत तुकाराम महाराज रुपनर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

अपघातानंतर तुकाराम महाराज यांना औरंगाबादमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गोडतेल घेऊन जाणार्‍या एका टँकरने कारला समोरून धडक दिली आणि याचवेळी कारने पेट घेतला. कारला आग लागल्याची माहिती दिल्यानंतर गेवराई नगर परिषद आणि गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली होती.

तेलाच्या टँकरला धडकल्यामुळे तुकाराम महाराज यांच्या नव्या कोऱ्या गाडीने पेट घेतला होता. त्यांच्याबरोबर एक मुलगाही होता, सुरुवातीला दोघांना गेवराईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण महाराजांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना औरंगाबादला हलवण्यात आलं होतं. तुकाराम महाराज हे तिंतरवणीमधील मठाचे मठाधिपती होते. शिवाय रेवकी गावातील मठाचेही ते मठाधिपती होते. रविवारी दुपारी 12 वाजता बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तिंतरवणीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.