दुष्काळ निवारणासाठी सरकारचा मेगा प्लॅन, देवेंद्र फडणवीस उतरणार फिल्डवर, राज्यभर दौरा करून…नेमका निर्णय काय?
ष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दुष्काळाची परिस्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली

राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दुष्काळाची परिस्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. बैठकीत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील पहिली अधिसूचना काढली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री स्वतः फिल्डवर उतरणार आहेत. ते काही भागांना भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
दुष्काळ कोणत्या भागात आहे आणि त्या भागात कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासंदर्भातील अधिसूचना शनिवारपूर्वी काढण्यात येणार आहे. एखादा भाग पहिल्या टप्प्यात राहिला तर पुढील टप्प्यात त्याचा समावेश केला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उद्यापासून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून केली जाणारी मदत तसेच केंद्र सरकारकडून मागण्यात येणाऱ्या मदतीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याच्या दृष्टीने माहिती संकलित केली जाणार आहे.
मुख्यमंत्री आणि आमदार बांधावर जाणार
राज्यातील काही भागांना मुख्यमंत्री स्वतः भेट देणार असून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी बांधावर जाण्यास सुरुवात झाली असून, आमदारांनाही आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी आणि तक्रारी थेट मांडता येणार आहेत.
तसेच केंद्र सरकारकडे देखील मदत मागितली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. मात्र, केंद्राच्या मदतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकार हातावर हात ठेवून वाट बघत बसणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. केंद्राकडून मदत मिळण्यास वेळ लागला तरी राज्य सरकारकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
मका आणि कापसाचं मोठं नुकसान
पुरेशा पावसाअभावी राज्यात बहुतांश भागात पिकं करपल्याचं चित्र दिसत आहे. विशेषत: मका,कापूस, यावर सर्वाधिक परिणाम झालेला दिसून आला. कोकणात भात पिकाचेही नुकसान झाले असून, त्याची आकडेवारी गोळा केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार पुढील उपाययोजना निश्चित केल्या जातील, असं फडणवीस यांनी सांगितलं.
दुष्काळाच्या काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपालिका तसेच पंचायत राज संस्थांना पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही बातमी अपडेट होत आहे.
