
श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात १० महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात घडण्यापूर्वीचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
हा व्हिडीओ अपघातग्रस्त पिकअप टेम्पोच्या आतला आहे. अपघात होण्याच्या काही काळापूर्वी हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. यात काळूबाई महिला बचत गटाच्या सदस्या आनंदाने एकत्र बसून विठ्ठलाची भक्तीगीते गाताना दिसत आहेत. या व्हिडीओत पिकअप टेम्पोत असलेल्या महिला छान हसत खेळत ताला सुरात गाणी गात असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्या सर्व महिला पंढरी नामाचा बाजार, इथं विठ्ठल विठ्ठल दुकानदार हे भक्तीगीत गाताना पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि उत्साह स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच दर्शनासाठी निघालेल्या त्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या महिलांनी जवळपास आठवडाभरापूर्वीच एकसारख्या पांढऱ्या साड्या खरेदी केल्या होत्या. त्याच साड्या परिधान करून त्या कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. पण दुर्दैवाने दर्शन घेण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातानंतर, पिकअप टेम्पोचा चालक ऋषिकेश रामदास करंडे (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मृतांवर पाईट येथील पापळवाडी गावात शोकाकुल वातावरणात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेमुळे आज पाईट पापळवाडी गाव दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे गावातील प्रत्येक घरात दु:ख आणि हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. राज्य सरकारने जखमी महिलांच्या उपचाराचा खर्च पूर्णपणे उचलण्याची घोषणा केली आहे. या घटनेमुळे दु:ख व्यक्त करत केंद्र सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर, राज्य सरकारनेही मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.