महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी लॉटरी, थेट 15 लाख नोकऱ्यांची निर्मिती; सरकारची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांच्या भेटीत महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा झाली. मायक्रोसॉफ्ट भारतात $17.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असून, यात महाराष्ट्राला प्राधान्य मिळेल.

महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी लॉटरी, थेट 15 लाख नोकऱ्यांची निर्मिती; सरकारची मोठी घोषणा
devendra fadnavis
| Updated on: Dec 12, 2025 | 1:57 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मायक्रोसॉफ्टने मुंबईसह महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील, असे बोललं जात आहे.

मायक्रोसॉफ्टसोबत महाराष्ट्रात ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर GCC (Global Capability Center) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, हे केंद्र सुमारे २० लाख स्क्वेअर फुटांवर उभारले जाईल. या केंद्राद्वारे ४५ हजार लोकांना थेट रोजगार मिळण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीमुळे एकूण १५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राला ‘AI हब’ बनवण्यावर भर

या बैठकीत महाराष्ट्राला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) हब बनवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. गुन्हे नियंत्रण, आरोग्यसेवा, शिक्षण, आणि कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये AI को-पायलटचा वापर कसा करता येईल, यावरही सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टसोबत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून गुन्हेगारी नियंत्रणाचे उदाहरण सत्या नडेला यांच्यासमोर मांडले.

भारतात १७.५ अब्ज डॉलरची ऐतिहासिक गुंतवणूक

सत्या नडेला यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट भारतात १७.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. या निधीचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटरसारख्या पायाभूत सुविधांसाठी केला जाईल. भारताच्या AI-युक्त भविष्यासाठी हेच हवे होते, असे नडेला म्हणाले. या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांची ही विनंती सत्या नडेला यांनी मान्य केल्याचे स्पष्ट केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत लवकरच मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.