Maharashtra News LIVE : इंडिया आघाडी, मविआला अचानक लोकशाहीचा पुळका आलाय- एकनाथ शिंदे

इंडिया आघाडीकडून दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra News LIVE : इंडिया आघाडी, मविआला अचानक लोकशाहीचा पुळका आलाय- एकनाथ शिंदे
breaking live update
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 01, 2026 | 10:58 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 01 Nov 2026 10:57 AM (IST)

    इंडिया आघाडी, मविआला अचानक लोकशाहीचा पुळका आलाय- एकनाथ शिंदे

    इंडिया आघाडी, मविआला अचानक लोकशाहीचा पुळका आलाय. विरोधकांनी मोदींना बदनाम करण्याचा डाव आखलाय. विरोधकांचा बुरखा फाडला पाहिजे. 1975ला आणीबाणी होती, आता तर सगळे मोकाट सुटलेत. विरोधकांनी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढून लोकशाहीचा अपमान केला असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 01 Nov 2026 10:49 AM (IST)

    मला खात्री आहे की राज्यसरकार शेतकऱ्यांना मदत करेल- शरद पवार

    मी माहीती घेतोय. माझ्या बरोबर स्थानिक आमदार आहेत. पाणी, चाऱ्याची स्थिती गंभीर आहे. सोलापूरमध्ये 135 टँकर आहेत. लोकांना एकप्रकारचा आधार मिळेल. मला खात्री आहे की राज्यसरकार शेतकऱ्यांना मदत करेल असे शरद पवार म्हणाले.


  • 01 Nov 2026 10:40 AM (IST)

    देशाची लोकशाही धोक्यात आहे- विश्वजित कदम

    देशाची लोकशाही धोक्यात आहे, राहुल गांधी मतचोरीचा मुद्दा सातत्याने मांडत आहेत. ज्यांनी घोटाळा केला त्यांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे असे विश्वजित कदम म्हणाले.

  • 01 Nov 2026 10:30 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गणेश नाईक एकाच व्यासपीठावर येणार

    ठाण्यातील लोकतंत्र बचाव पदयात्रेला महायुती मधीलच दोन विरोधक आमने सामने पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गणेश नाईक एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या आधी अनेक वेळा गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केलेला आहे. तर विरोध म्हणून नरेश मस्के व शिवसेनेच्या नेत्यांनी देखील गणेश नाईक यांच्या विरोधात बोलताना पाहायला मिळाला आहे.

  • 01 Nov 2026 10:20 AM (IST)

    आमची सेना रामाच्या आदर्शावर उभी आहे- संजय राऊत

    आमची सेना रामाच्या आदर्शावर उभी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे नसले तरी येथे सुप्रिया सुळे आहे. मी आहे. आमचा पक्ष इंडिया ब्लॉकबरोबर ठामपणे उभा आहे असे संजय राऊत म्हणाले.


  • 01 Nov 2026 10:10 AM (IST)

    ज्ञानेश कुमारांना कुठलाही नैतिक अधिकार नाही- संजय राऊत

    ज्ञानेश कुमारांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्यांना धक्के द्यावे लागतील. रामलिला मैदानावर संपूर्ण देशभरातून लोक येतायेत. भाजपच्या टीकेला काही अर्थ राहीला नाही. भाजपची रावणलीला नष्ट करण्यासाठी आम्ही रामलीलावर आंदोलन करणार आहोत. भाजपच्या लोकांनी रामायण नीट वाचले पाहीजे असे संजय राऊत म्हणाले.

  • 01 Nov 2026 09:57 AM (IST)

    राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, सूत्रांची माहिती

    प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात राम पुर्णेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पूर्णेकर हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळणार मारेकरी यांना सरकार पाठीशी घालणार नाही,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना दिले.

  • 01 Nov 2026 09:55 AM (IST)

    डोंबिवली पूर्वेतील पाणीपुरवठ्याला १६ तासांचा ब्रेक!

    डोंबिवली पूर्वेतील पाणीपुरवठ्याला १६ तासांचा ब्रेक लागलाय.  खंबाळपाड्यात जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या नेतिवलीच्या ११०० मिमी मुख्य जलवाहिनीला खंबाळपाड्यात मोठी गळती होत आहे.  गळती दुरुस्तीसाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय.

  • 01 Nov 2026 09:50 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट!

    धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावलं आहे.  जिल्ह्यातील २२५ प्रकल्पांत केवळ ५.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महिनाभरात १.६३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे. ६४ प्रकल्प कोरडेठाक, १०७ प्रकल्प मृत साठ्याखाली आहेत. सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा असून मध्यम प्रकल्पांत अवघे ४.९२ टक्के पाणी आहे.  १२ गावांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

  • 01 Nov 2026 09:40 AM (IST)

    ठाण्यात आज ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा

    ठाण्यात आज ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र येणार आहेत.  लोकतंत्र बचाव’साठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे.  पाचपाखाडी ते तलावपाळी भाजपची पदयात्रा असणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.  ठाण्याच्या अहिल्यादेवी होळकर चौक जवळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 01 Nov 2026 09:32 AM (IST)

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक : जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ

    सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान सुरू झालं आहे. जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. मतदान झाल्यावर मत दाखवण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे.   गुप्त मतदानाचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी आमदार विक्रम सावंत आणि माजी सभापती सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला. विक्रम सावंत यांनी मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

  • 01 Nov 2026 09:30 AM (IST)

    शरद पवारांचा आजपासून दुष्काळी भागाचा दौरा

    शरद पवार आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. शरद पवार हे 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधित दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रमधील सोलापूर जिल्ह्याचा शरद पवार दुष्काळी दौरा करणार आहेत.  आज माढा तालुक्यातील तुळशी गावात दौरा होईल. तर 2 नोव्हेंबरला परांडा, बार्शी, धाराशिव असा दौरा असेल.  तर 3 नोव्हेंबरला केज, माजलगाव, गेवराई, बीड भागातील पाहणी करणार आहेत. तर 4 नोव्हेंबर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भाग करून बारामतीत परत येणार आहेत.

  • 01 Nov 2026 09:20 AM (IST)

    सह्याद्री वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा नागपुरातून एल्गार

    सह्याद्री वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत नागपुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे.  कर्जत येथील भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार असल्याने या प्रकल्पाला पर्यावरण कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे.  या लढ्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे राज्यभरात या प्रकल्पा विरोधात लढा उभारणार आहेत. त्याचा बिगुल सोमवारी नागपुरातून वाजणार आहे, स्वतः सयाजी शिंदे यासाठी उपस्थित राहणार आहेत.

  • 01 Nov 2026 09:07 AM (IST)

    रत्नागिरीत अंजनारी पुलावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

    रत्नागिरी- लांजा – अंजनारी पूल येथे भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात  ASI संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला.  हातखंबा पोलीस वाहतूक शाखेच्या गाडीला कंटेनरची धडक बसली. त्यानंतर गाडी अंजनारी नदीत खोल उतारावर उलटली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीसाठी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाले आहेत. या रॅलीसाठी दोन मुख्य स्टेज केले असून कार्यकर्त्यांना बसण्यासाठी हजारो खुर्च्या लावण्यात आल्यात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे. या रॅलीसाठी देशभरातून पदाधिकारी पोहोचायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील नांदेड येथून सेवादलाचे कार्यकर्ते पोहोचले असून पावसामुळे खराब झालेलं ग्राऊंड सेवादलाच्या पदाधिकारी यांनी स्वच्छ केलंय. मतचोरी होत असून ती EVM माध्यमातून होत आहे. त्यामुळे निवडणूका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली. दुसरीकडे ठाण्यातही भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाण्यात आज पदयात्रेमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. फडणवीस-शिंदेंच्या पदयात्रेसाठी ठाणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पाचपाखाडी ते तलावपाळी पदयात्रा ठाण्यात अनेक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानासाठी जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.21 पैकी 15 जागा बिनविरोध झाले असून 6 जागांसाठी वेगवेगळ्या गटातून निवडणूक होत आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही जत सोसायटी गटातील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची आहे. त्याचबरोबर माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमन आर आर पाटील यांच्यात तासगाव सोसायटी गटासाठी लढत होत आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाने एकत्रित येत 15 जागा बिनविरोध केले आहेत. मात्र उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान पार पडत असून गोपीचंद पडळकर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us