
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. यानंतर आता सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्राबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्र होणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी विजयी सभा होणार आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले.
राज ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी ५ जुलैला विजयी मेळावा एकत्र काढण्याबद्दलच्या प्रस्तावावर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे तुम्हाला सांगू, असे म्हटले.
“काल मला संजय राऊत यांचा फोन आला होता. ते म्हणाले काय करायचं पुढे. म्हटलं मोर्चा तर रद्द करावा लागेल. ते म्हणाले विजयी मेळावा घ्यायचा का. ५ तारखेला घेऊ का म्हणाले. म्हटलं घ्या. पण ठिकाण ठरवू नका. सहकाऱ्यांशी बोलून मेळावा घेऊ. तेही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलतील. मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. तुम्हीही लावू नका. वर्तमानपत्र आणि चॅनलने हा विषय लावून धरला. अशा बाबत सर्व जागरूक असले पाहिजे. कुठे कुठे काय काय घडतंय हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ५ तारखेच्या मेळाव्याचा निर्णय कुठे होईल हे तुम्हाला सांगू”, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंना ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, म्हणून हा निर्णय रद्द करण्यात आला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “तुम्ही मोर्चाला पक्षीय लेबल लावू नका. विजयी मेळावा झाला तरी लेबल लावू नका. युती आघाडी, निवडणुका येत जातील, पण मराठी भाषा संपली की परत येणार नाही. भाषा ही संस्कृती टिकवते. तीच मुळाशी गेली तर युती आघाड्यांना काय अर्थ आहे. युती आघाडीचा विचार आता करून चालणार नाही. या गोष्टीकडे संकट म्हणून पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नये”, असे राज ठाकरेंनी म्हटले.
“उद्या मेळावा वैगरे काय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला कळवेन. कोणताही अजेंडा नसेल. आधीच सांगितलं. मग नरेटिव्ह त्यांनी सेट केला की आम्ही. अजित पवार यांनीही विरोध केला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ना”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.