कधी कधी नियती… बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, वडिलांचा फोटो शेअर करत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी वडील सुनील तटकरे आणि स्वतःच्या राजकीय प्रवासातील तारखांचा एक अद्भूत योगायोग सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कधी कधी नियती... बिनविरोध विजयी होताच अनिकेत तटकरेंची पोस्ट, वडिलांचा फोटो शेअर करत म्हणाले...
Aniket Tatkare Sunil Tatkare
| Updated on: Jun 05, 2026 | 1:31 PM

राजकारणात अनेकदा विविध अनपेक्षित घडामोडी घडत असतात. पण कधीकधी नियती असा काही विलक्षण योगायोग घडवून आणते की पाहणारेही थक्क होतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आहे. अनिकेत तटकरे यांनी वडील खासदार सुनील तटकरे आणि स्वतःबद्दलच्या यांच्या राजकीय प्रवासातील तारखांचा एक अद्भूत योगायोग या पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे.

अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दोन महत्त्वाच्या कालखंडांचा आणि तारखांचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून येण्यासोबतच वडील पहिल्यांदा खासदार कधी झाले, याचा उल्लेख केला आहे. हा योगायोग केवळ आकड्यांचा नसून तटकरे कुटुंबाने जनतेशी जोडलेल्या नात्याची आणि विश्वासाची पोचपावती आहे, असेही अनिकेत तटकरे म्हणाले

अनिकेत तटकरेंची पोस्ट

“दोन तारखा…दोन प्रवास…आणि विलक्षण योगायोग!

कधी कधी नियती आपल्या आयुष्यात अशी काही किमया करत असते की अगदी आश्चर्यचकित करुन टाकते.

दि. २४ मे २०१८ – माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय दिवस जेव्हा मला प्रथमच आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी लाभली.

अगदी वर्षभरानंतरच… दि. २४ मे २०१९ – मा. खासदार सुनीलजी तटकरे साहेब प्रथमच लोकसभेवर निवडून गेले.

काळाने पुन्हा एक विलक्षण वर्तुळ पूर्ण केले.

दि. ४ जून २०२४ रोजी जनतेने साहेबांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवत त्यांना दुसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत पाठवले. आणि काल, दि. ४ जून २०२६ रोजी मला दुसऱ्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली.

या योगायोगाकडे पाहताना मन नकळत भावूक होते. कारण हा केवळ तारखांचा योग नाही, तर ही जनतेने दाखवलेल्या विश्वासाची, कार्यकर्त्यांनी दिलेल्या साथ-सहकार्याची आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाची साखळी आहे. काही गोष्टी आपण ठरवतो, काही गोष्टी नियती ठरवत असते. या क्षणी माझ्या मनात अभिमानापेक्षा कृतज्ञता अधिक आहे. हा योगायोग जपून ठेवावा असा आहे. कारण यात तारखांपेक्षा अधिक नात्यांचा आणि विश्वासाचा एक अनमोल इतिहास दडलेला आहे”, असे अनिकेत तटकरे यांनी म्हटले.

दरम्यान कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे बाळ माने अशी लढत रंगणार होती. मात्र बाळ मानेंनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय झाला.

Follow Us