महाराष्ट्रातल्या बड्या बँकेचा थेट परवाना रद्द, RBI चा तडकाफडकी निर्णय, तुमच्या पैशांचं काय होणार?
RBI Cancels Bank License : आरबीआयने महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेशी भांडवली क्षमता आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील फलटन येथील द यशवंत सहकारी बँक या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेशी भांडवली क्षमता आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने आणि बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचे पालन करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती RBI ने दिली आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत ही बँक आपल्या ठेवीदारांना संपूर्ण रक्कम परत करण्यास सक्षम नसल्याचेही केंद्रीय बँकेने म्हटले आहे. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ग्राहकांच्या पैशांच काय होणार?
RBI ने महाराष्ट्राच्या सहकार आयुक्त आणि निबंधक यांना बँक बंद करण्याची आणि परिसमापक नियुक्त करण्याची विनंती केली आहे. RBI च्या माहितीनुसार, बँकेचे 99.02 टक्के ठेवीदार त्यांच्या संपूर्ण ठेवी परत मिळवण्यास पात्र आहेत. DICGC अंतर्गत ठेवीदारांना कमाल 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. DICGC ने 20 एप्रिल 2026 पर्यंत 106.96 कोटी रुपयांचे वितरणही केल्याची माहिती देण्यात आली आहे.
19 मे पासून बँकेचे कामकाज बंद
RBI च्या आदेशानुसार, ही सहकारी बँक 19 मे 2026 रोजी कामकाज संपल्यानंतर सर्व बँकिंग व्यवहार थांबवणार आहे. यापूर्वीही RBI ने अनेक सहकारी बँका आणि NBFC कंपन्यांवर कठोर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी कर्नाटकातील कारवार नागरी सहकारी बँकेचा परवानाही रद्द करण्यात आला होता. तसेच पेटीएम पेमेंट बँकेविरोधातही नियमभंगाच्या कारणावरून मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर आता आरबीआयने द यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.
याआधीही अनेक बँकांवर आरबीआयची कारवाई
दरम्यान, RBI ने अलीकडेच देशभरातील सुमारे 150 NBFC कंपन्यांचे नोंदणी प्रमाणपत्र (CoR) रद्द केले होते. यामध्ये सर्वाधिक कंपन्या दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील होत्या. RBI च्या या कारवायांमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांविरोधात केंद्रीय बँक कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.