महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

महेश ट्युटोरियल्स हा मुंबईतील नामांकित क्लासेसपैकी एक क्लास होता. दरवर्षी हजारो विद्यार्थी या क्लासेसमध्ये अ‍ॅडमिशन घ्यायचे पण आता अचानक क्लास बंद झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे. या मागे कारण तरी काय आहे ते पाहा...

महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लासेस बंद, एकाचवेळी राज्यातील 33 शाखांना टाळं, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
mahesh tutorials shut
| Edited By: | Updated on: Jul 17, 2026 | 10:50 AM

मुंबई आणि राज्यभरात महेश ट्युटोरियल्सची 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम. मुलुंड इथल्या शाखेला टाळं लागलेले आहे. सगळ्यात आधी इथलीच शाखा बंद झाल्याची माहीती समोर आली आहे. महेश ट्युटोरियल्सने कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या सुमारे 2,500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य ऐन शैक्षणिक वर्षात संकटात सापडले आहे. संस्थेने पालकांना बैठकीसाठी बोलावून विद्यार्थ्यांचे अरिहंत अकॅडमीमध्ये हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

महेश ट्युटोरियल्सची स्थापना 1988 मध्ये झाली होती आणि मुंबईसह महाराष्ट्रातील ही एक प्रतिष्ठित कोचिंग संस्था मानली जात होती. मात्र, तिची मूळ कंपनी एमटी एज्युकेअर डिसेंबर 2022 पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणसमोर दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरी जात आहे. दरम्यान, कोणतीही पूर्वकल्पना न देता कोचिंग सेंटर्स बंद केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक पालकांनी भरलेले शुल्क, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध धर्मादाय संस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून अचानक केंद्रे बंद करणे, शुल्क परताव्याचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील खासगी कोचिंग संस्थांच्या नियमनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलुंड येथून सुरु झालेल्या महेश ट्युटोरियल्सच्या राज्यभरात तब्बल 60 शाखा होत्या. यापैकी 40 शाखा या मुंबईत होत्या.

महेश ट्युटोरियल्स क्लासेस हे दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात येत आहे अशी माहिती समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु होती परिणामी आता क्लासेस बंद करण्याची वेळ आलीच. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ऑडिटमध्ये संस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कंपनीवर सध्या 32.33 इतक्या कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us