
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले. सलग ५ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला. मनोज जरांगे यांच्यापुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, डोंगरीसह मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे आणि दमदाटी करणे यांसारख्या आरोपांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात आंदोलकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्यानंतर मंगळवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यानंतर मुंबईत आलेले हजारो मराठा आंदोलक हे पुन्हा माघारी परतण्यास सुरुवात झाली. मात्र, या आंदोलनादरम्यान मुंबई शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील झोन १ च्या हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात ३, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २ तर जे. जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, दमदाटी करणे यांसारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि सामान्य नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे शांतता राखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठा समाजाचे बांधव आपापल्या गावाकडे परतले आहेत. परंतु, आता हे गुन्हे दाखल झाल्याने काय करायचं, असा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सहभागी असलेल्या आंदोलकांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे दाखल करण्याची ही प्रक्रिया पुढील काळातही सुरूच राहण्याची शक्यता आहे.