
“मी एक सामान्य प्रवक्ता म्हणून तिथे होतो. माझ्यावर जेवढी जबाबदारी होती, तेवढी मी चांगल्या रितीने पार पडली. पण गेल्या काही दिवसात मला वाटू लागलं की आता कुठे थांबलं पाहिजे म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला. बाकी काही नाही त्यात” असं प्रकाश महाजन म्हणाले. आज प्रकाश महाजन यांनी मनसेतील सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. थांबावं असं का वाटलं? त्यावर प्रकाश महाजन म्हणाले की, “कधीकधी आपल्याला या वयात लक्षात आलं नाही, तर काय उपयोग?. आता आपली गरज तिथे फारशी राहिलेली नाही. काही गोष्टी मध्यंतरी घडल्या त्या सगळ्या लोकांना माहित आहेत. म्हणून मी फक्त जर मनसेत अपराधी असेन तर फक्त अमित ठाकरेंच्या बाबतीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललेलो की, अमितजी मी तुमच्यासोबत, तुमच्या मुलासोबत काम करेन. मनुष्य एक विचार करतो नशीब काही दुसरच ठरवतं”
“मला लक्षात आलं की, अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली. क्षमता असून काम मिळालं नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही. आपल्याला काहीच नको होतं. थोडाबहुत सन्मान, थोडंबहुत काम हवं होतं. एवढ्या कमीत कमी अपेक्षा जिथ पूर्ण होऊ शकत नाहीत, एवढा ताणतणाव नको वाटला मला. दोन भाऊ एकत्र आले. आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आपल काम संपलं” अशा मनातल्या भावना प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवल्या. काय अपेक्षा होत्या? त्यावर प्रकाश महाजन म्हणाले की, “मला वाटतं होतं की, पक्षाच्या प्रचारात घ्यावं. पक्ष संघटनेत जबाबदारी द्यावी. असं काही झालं नाही. मी पक्षाच्या मेळाव्यात बोललो होतो की, आयुष्यात काही करायचं आहे, ते माझ्या नातीसाठी आणि साहेबासाठी. पण माहित नाही का झालं नाही, कोणाला दोष देणार नाही.”
पण साधी माझी दखल कोणी घेतली नाही
पक्ष सोडावा लागला, अशा काय घटना घडल्या? “11 जुलैनंतर मला वाटलं पक्षाला आता आपली फार गरज नाही. मी दोन महिने वाट पाहिली काहीतरी सकारात्मक घ़डेल. पण साधी माझी दखल कोणी घेतली नाही. दरवाजा पर्यंत आणून सोडलय. मग, तिथेच रहायचं की बाहेर पडायचं हे आपण ठरवायचं” असं प्रकाश महाजन म्हणाले.
नारायण राणेंविरोधात दंड थोपटले, त्याचे हे दुष्परिणाम आहेत का?
“का तुम्ही जखमेवरची खपली काढताय? पक्षाने मला एकट्याला सोडलं हे सगळ्या जगाने बघितलं. प्रकाश महाजन एकटा लढला. दोन भावांनी एकत्र यावं ही भूमिका जाहीरपणे मांडली, त्याचे बोल ऐकावे लागले.पण आज दोन भाऊ एकत्र आहेत, आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासारख्यांच्या सदभावना त्यामागे आहेत हे कोणी विचारात घेत नाही. काही गोष्टी नको वाटल्या प्रत्येकवेळी संघर्ष करायचा नसतो, शांततेत जगू, थोडंबहुत वाचन करु ” असं प्रकाश महाजन म्हणाले.
राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
“राज ठाकरेंच्या बाबतीत एकच म्हणेन रस्सी जल गई मगर बल नही गया, हे मी माझ्या बाबतीत म्हणतोय. एखादा व्यक्ती पूर्णपणे मनातून काढू शकत नाही, असे राज ठाकरे आहेत. माझं वय क्षमा करण्याचं आहे. अपराधी फक्त अमित ठाकरेंचा आहे. माझ्यावर जेवढ्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या व्यवस्थित पार पडल्या. पण त्याचं म्हणाव तेवढ कौतुक झालं नाही” ही खंत प्रकाश महाजन यांनी बोलून दाखवली.