शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी… पेरणीची घाई करू नका… नाही तर… जिल्हाधिकाऱ्याचा मोठा इशारा काय?

यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा आहे. वेळेपूर्वी पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, डिझेल दरवाढ आणि मजूर टंचाईमुळे खरीप हंगामाचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी... पेरणीची घाई करू नका... नाही तर... जिल्हाधिकाऱ्याचा मोठा इशारा काय?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 22, 2026 | 2:45 PM

राज्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. यंदा राज्यात उतरत्या क्रमाने पाऊस असणार असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस सामान्यच राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच नियोजन करावं लागणार आहे. कृषी तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या हवाल्यानुसारच शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. नाही तर दुबार पेरणीचं मोठं संकट येऊ शकतं, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही ही चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हे आवाहन केलं आहे. यंदा एल निनोचा प्रभाव कमी असल्याने पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवीला जातं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. शेतकऱ्यांनी पावसाचा अधिकृत अंदाज घेऊनच पेरणीला लागावे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफ पद्धतीनेच करावी. पेरणी पूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खते वेळेपूर्वीच खरेदी करावीत, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

नांगरणीसाठी एकरी सुमारे 3 हजार खर्च

दरम्यान, डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. खरीप हंगामाच्या तयारीला लागलेले शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. नांगरणी आणि मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेती परवडेनाशी झाली आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असताना डिझेलच्या वाढलेल्या दरांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची नांगरणी आणि मशागत करण्यासाठी आता शेतकऱ्यांना एकरी तब्बल तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. अगोदरच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. आता डिझेल दरवाढीमुळे शेतीचा खर्च आणखी वाढला असून शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पेट्रोल डिझेल टंचाईचा डोंगर

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीची कामे सुरू केली असताना आतापासूनच शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. मजुरीचे दर दुपटीने वाढले असून त्यामुळे मजूर मिळेनासे झाले आहेत. दुसरीकडे चार ते पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची कामे ठप्प झाली असल्याने शेतकरी आणि ट्रॅक्टरधारक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

अवकाळी पावसाच्या सततच्या इशाऱ्यांमुळे रब्बी हंगामाची कामे घाईघाईने पूर्ण करावी लागली. शेतकऱ्यांना दरवर्षीपेक्षा दुप्पट मजुरी देऊन शेत रिकामे करावे लागले. आता खरीपपूर्व मशागतीची वेळ आली असताना डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कपाशी लागवड केल्यास उत्पादन चांगले येत असल्याची शेतकऱ्याची धारणा आहे.

Follow Us