सारंगखेड्याच्या घोडेबाजारातील कोट्यवधींचे चेतक आणि सुलतान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

नंदुरबार : सारंगखेड्याचा घोडेबाजार अश्वप्रेमींसाठी पर्वणी असतो. हा बाजार जातिवंत घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची खरेदी-विक्री या ठिकाणी होत असते. या वर्षी सारंगखेडा घोडे बाजारात कोट्यावधी किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झाले असून घोडे बाजारात येणाऱ्या अश्वप्रेमी महागडे घोडे पाहण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजरात दाखल होत आहेत. सारंगखेडा घोडेबाजारात आतापर्यंत सर्वात महाग म्हणून […]

सारंगखेड्याच्या घोडेबाजारातील कोट्यवधींचे चेतक आणि सुलतान
Follow us on

नंदुरबार : सारंगखेड्याचा घोडेबाजार अश्वप्रेमींसाठी पर्वणी असतो. हा बाजार जातिवंत घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची खरेदी-विक्री या ठिकाणी होत असते. या वर्षी सारंगखेडा घोडे बाजारात कोट्यावधी किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झाले असून घोडे बाजारात येणाऱ्या अश्वप्रेमी महागडे घोडे पाहण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजरात दाखल होत आहेत. सारंगखेडा घोडेबाजारात आतापर्यंत सर्वात महाग म्हणून दाखल झालेल्या या घोड्यांचं सुलतान आणि चेतक असं आहे.

घोड्यांची किंमत, त्याची उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरते. घोडा जितका रुबाबदार, तितकी त्याची किंमत जास्त.. सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या सुलतानची किमत एक-दोन लाख नाही तर तब्बल एक कोटी 11 लाख रुपये आहे.

आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का? सुलतान सारंगखेडा घोडा बाजारात दाखल 2000 घोड्यांमध्ये रुबाबदार आहे. त्याची उंची सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तो पांढरा शुभ्र आहे. त्याचे डोळे निळे असून त्याची चाल रुबाबदार आहे. तो आजपर्यंत या घोडे बाजारातील सर्वात उंच घोडा आहे. सुलतानची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर असतात. त्याच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. त्याला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावराणी तूप आणि चणाडाळ गहू आणि बाजरी, त्याचसोबत कोरडा आणि सुका चारा दिला जातो. सुलतान मध्य प्रदेश मधील उजैन येथून आला आहे. त्याचे मालक मानसिंग राजपूत हे सुलतान आमच्या परिवारातील एक सदस्य असल्याचं सांगतात.

सारंगखेडा येथील घोडे बाजरात सुलताननंतर बोलबाला आहे तो हुकूमसिंग अंजना यांच्या चेतक या घोड्याचा.. देशभरात झालेल्या घोड्यांच्या स्पर्धेत हा चेतक सलग सहा वेळा विजयी ठरला आहे. चेतक मारवाड जातीचा असून त्याचे चारही पाय पांढरे आहेत. तो संपूर्ण काळा असून त्याच्या डोक्यावर पांढरा पट्टा आहे. याला पंचकल्याण असं म्हणतात. चेतकची उंची 64 इंच आहे. एखाद्या पैलवानाप्रमाणे त्याच्या खुराकाची काळजी घेतली जाते. त्याच्या आहारात दररोज 5 लिटर दूध 1 किलो तूप, अंडी, गहू, चना, गहू आदी खाद्यांचा समावेश आहे. चेतकची रुबाबदार चाल अनेकांना भुरळ घालत आहे. चेतकला पाहण्यासाठी आलेले अश्वप्रेमी त्याच्या सर्व अदा आपल्या डोळ्यात सामावून घेत आहेत.

इतके महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शौकींनांना शक्य नसल्याने देशभरातील अश्वप्रेमी या दोन्ही घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावत असतात. असे रुबाबदार घोडे आजपर्यंत आम्ही कुठेही पहिले नसल्याचं अश्वप्रेमी सांगतात.

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल दत्त जयंतीपासून अधिक रंगतदार होणार आहे. 22 तारखेपर्यंत असे किंमती घोडे दाखल होतील. त्यांच्या किंमती दोन कोटीपर्यंत असतील असं अश्व जाणकार सांगतात. तुम्हालाही रुबाबदार घोडे पाहायचे असतील तर सारंगखेड्याच्या घोडेबाजाराला नक्की भेट द्या…