
महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं वेगाने बदलताना पहायला मिळतायत. राजकीय भविष्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करत आहेत. काल पर्यंत अमुक एकापक्षाचा असलेला कार्यकर्ता, पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करतोय. मतदारांसाठी सुद्धा हा एकप्रकारचा धक्का आहे. कारण वर्षानुवर्षाची निष्ठा एकाक्षणात बदलली जात आहे. महाविकास आघाडीतून आऊट गोईंगच प्रमाण जास्त आहे. महायुती सत्तेवर असल्याने तिथे इनकमिंग जास्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्ते आणि पक्ष दोघांसाठी महत्वाच्या असतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून भविष्यात आमदार, खासदार मंत्री घडतात, तर याच निवडणुकांमुळे पक्ष विस्तार होऊन तळागाळात पक्षाला बळकटी मिळते, म्हणून पक्षासाठी सुद्धा ही निवडणूक महत्वाची असते.
आता याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांचे जवळचे विश्वासू पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते यांनी, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शकील जनाब, युवक अध्यक्ष अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश केला. हा एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. काही वर्षांपूर्वी एकनाथ खडसे यांची जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती पकड होती. पण मागच्या काही काळात त्यांची पिछेहाट झाली. भाजपच्या अंतर्गत राजकारणात एकनाथ खडसे हे बाजूला गेले. सध्या ते आणि त्यांच्या कन्या रोहणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. वाढतं वय आणि वृद्धत्व यामुळे एकनाथ खडसे यांची आता जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्वीसारखी पकड राहिलेली नाही. त्यांना आव्हान देणारे अनेक नेते आता जिल्ह्यात आहेत.
जबाबदारी मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी चुणूक दाखवली
दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जळगावमधील तीन नगरपंचायतींची जबाबदारी सोपवण्यात आली. यात रावेर, सावदा आणि मुक्ताईनगरची नगरपंचायत आहे. जिल्ह्याच्या राजकारणातील चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा. पक्ष विस्तार, पक्षाची ताकद वाढवण आणि संघटनात्मक बळकटी या उद्देशाने एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. जबाबदारी मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपली चुणूक दाखवून दिली व एकनाथ खडसे यांना पहिला धक्का दिला.