सण उत्सवामध्ये फटाक्यांवर बॅन, लेझर लाईट दिसल्यास…कोर्टाचा महत्त्वाचा आदेश!
डीजे आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषण संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर आज सूनवाई झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

सध्या सणासुदीचा काळ आहे. राज्यभरात गणेशोत्सवाची धूम असून अनेक ठिकाणी सार्वनजिक गणेश मंडळांनी बप्पाची स्थापना केली आहे. आता याच सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा डीजे, लाऊडस्पीकर आणि ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे. डीजे, लाऊड स्पीकरवर बंदी घालावी अशी मागणी केली जातेय. तसेच ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असंही म्हटलं जातंय. दरम्यान, आता याच मागणीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.
उत्सवाच्या दरम्यान फटाके वाजवता येणार नाहीत
डीजे आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनी प्रदूषण संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर आज सूनवाई झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी सण उत्सवाच्या दरम्यान फटाके वाजवता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी लेजर लाइट्सचा वापर करता येणार नाही, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
ध्वनी प्रदूषण झाल्यास किंवा…
त्याचप्रमाणे डीजे किंवा साउंडच्या आवाजाची मर्यादा कोर्टाने निर्धारित करून दिली त्यापेक्षा जास्त वाढवता येणार नाही, असंही न्यायालायाने आपल्या निर्देशात सांगितलं आहे. याबाबतचे नोटिफिकेशन पोलीस सहायक उपायुक्त आणि उपआयुक्त स्तरावर यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांना नोटिफिकेशन काढण्यास सांगण्यात आले असून त्याद्वारे उत्सवादरम्यान आणि इतर वेळा ध्वनी प्रदूषण झाल्यास किंवा आवाजाची मर्यादा ओलांडल्यास पोलिसांनी कारवाई करावी, असेही न्यायालयाने सांगितलेय.
पोलिसांनी कारवाई न केल्यास संबंधित ACP आणि DCP यांनी कारवाई करावी. त्रिमूर्तीनगर रेसिडेंट असोसिएशन या याचिकाकर्त्यांकडून मारबत उत्सवाच्या दरम्यान ध्वनी प्रदूषण झाल्याचे व्हिडिओ पुराव्यादाखल न्यायालयासमोर सादर केले होते. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने हा निर्देश दिला आहे.
पोलीस आता निर्देशाचे पालन कसे करणार?
दरम्यान, पुण्यातील विद्यानंद बापट यांनी ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उचलून धरल्यानंतर राज्यभार उत्सवांदरम्यानचा गोंगाट चर्चेचा मुद्दा ठरला. बापट यांनी ढोल ताशांवरही बंदी घालावी असी मागणी केली होती. आता न्यायालयाच्या निर्देशांचे पालन कसे केले जाणार? पोलीस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.