
महाराष्ट्र व मुंबईसह अनेक ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तूफान पाऊस कोसळत असून सखल भागांतबरंच पाणी साचलं आहे. सततच्या पावसामुळे, पाणी साचल्यामुळे बराच गोंधळ उडाला असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी घरांत तसेच दुकानातही पाणी घुसलं असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस पुढेही तसाच कायम राहणार असून हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढचे चार तासही विशेष महत्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर येत्या 24 तासांतही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईन, हार्बर आणि सेंट्रल रेल्वेवरही परिणाम झाला असून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कुर्ला ते चुनभट्टीदरम्यान लोकल वाहतूक 11 नंतर बंद झाली. तर वडाळा ते शिवडी मार्गांवर पाणी साचल्याने तेथील रेल्वे वाहतूक अर्ध्या तासाने सुरू आहे.
दरम्यान मुंबईत काल ( 18 ऑगस्ट) पासूनच सतत पाऊस कोसळत असून सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झाली ते जाणून घेऊया.
कुठे पडला सर्वाधिक पाऊस ? वाचा आकडेवारी
मुंबईत काल १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ ते आज १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत (२४ तास) पावसाची सर्वाधिक नोंद झालेली ठिकाणे
(पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)
पश्चिम उपनगरे
१) चिंचोली अग्निशमन केंद्र – ३६१
२) कांदिवली अग्निशमन केंद्र – ३३७
३) दिंडोशी वसाहत महानगरपालिका शाळा – ३०५
४) मागाठाणे बस आगार – ३०४
५) वेसावे उदंचन केंद्र – २४०
शहर
१) पर्जन्य जलवाहिन्या कार्यशाळा, दादर – ३००
२) बी. नाडकर्णी महानगरपालिका शाळा, वडाळा – २८२
३) फ्रॉसबेरी जलाशय, एफ दक्षिण विभाग – २६५
४) प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, शीव – २५२
५) सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळा, वरळी २५०
पूर्व उपनगरे
१) चेंबूर अग्निशमन केंद्र – २९७
२) इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी – २९३
३) पासपोली महानगरपालिका शाळा, पवई – २९०
४) वीणा नगर महानगरपालिका शाळा – २८८
५) टागोर नगर महानगरपालिका शाळा – २८७
मंत्री उदय सामंत यांनी कर्मचाऱ्यांचे मानले आभार
दरम्यान मंत्री डॉ. उदय सामंत यांनी कठीण प्रसंगी मदतीसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ” मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कठीण प्रसंगी मदतीसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या माझ्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, आपत्कालीन यंत्रणेतील सर्व कर्मचारी, NDRF, SDRF जवान तसेच सेवाभावी संस्था – आपल्या सर्वांचा मला अभिमान आहे.” असे त्यांनी नमूद केलं.
तसेच ” आपण मानवतेसाठी सदैव तत्पर असता. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहात. पाऊस आपली परीक्षा पाहत आहे. आपल्या कार्याला माझा प्रणाम.आपल्या सुरक्षेसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मला कल्पना आहे की आपल्या कार्यासमोर मी अत्यंत क्षुल्लक आहे; पण तरीदेखील काही मदत करू शकत असेन तर मला जरूर फोन करा. मी माझ्या अल्पशा क्षमतेनुसार आपल्या सोबत खंबीर उभा आहे.प्रशासनातील माझे सर्व अधिकारी व कर्मचारी देखील जबाबदारीने कार्यरत आहेत, त्यांचेही मी मनापासून कौतुक करतो. पुन्हा एकदा, आपल्या कार्याला माझा प्रणाम!” असंही त्यांनी म्हटलं.
तसेच नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. आवश्यकता व गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहनही सामंत यांनी केलं आहे.