
Ajit Pawar presents Maharashtra Budget: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश दाखवले. त्यासाठी लाडक्या बहिणींचा आभार मानले. अजित पवार म्हणाले, लाडक्या बहिणी मिळाल्या अन् आम्ही धन्य झालो, बारा कोटी प्रियजणांना मान्य झालो. विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो… पुन्हा आलो…
अजित पवार म्हणाले, सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र व्हावे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी केला आहे. विकसित भारत तयार करण्यासाठी आम्ही राज्यातील शाश्वत कामे हाती घेतली आहे. आम्ही कृषी आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही.
अजित पवार यांनी राज्यात होणारी गुंतवणुकीचा आढावा अर्थसंकल्पीय भाषणात घेतला. ते म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे देशी आणि परदेशी गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगार वाढत असून उत्पन्नात वाढ होत आहे. येत्या काळात १५ लाख ६५४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १६ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. आपण १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या कार्यक्रमामुळे प्रशासन पारदर्शी होणार आहे. आम्ही उत्कृष्ट कार्यकरणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणार आहोत.
औद्योगिक धोरण २०२५ लवकरच जाहीर करू. त्यानुसार २० लाख कोटी गुंतवणूक आणि ५० लाख रोजगाराच्या निर्मितीचे लक्ष असणार आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण तयार करण्यात येणार आहे. नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. केंद्राने आयकरात सूट देत मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, त्याचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, राज्यातील पायाभूत सुविधा व प्रकल्पांना भरीव तरतूद केली. विकसित राष्ट्र संकल्प सिद्धिस नेण्यासाठी महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.