रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना राखी, बदलापूरच्या विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन

बदलापूरमध्ये रेल्वे रुळ न ओलांडण्याचं आवाहन करत विद्यार्थ्यांनी प्रवाशांना सुरक्षेची राखी बांधत रक्षाबंधन साजरं केलं

रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना राखी, बदलापूरच्या विद्यार्थ्यांचं अनोखं रक्षाबंधन
| Updated on: Aug 15, 2019 | 9:36 AM

बदलापूर : थोडासा वेळ वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लहानग्यांनी अनोखी शिकवण दिली. रेल्वे रुळ न ओलांडण्याचं आवाहन करत विद्यार्थ्यांनी या प्रवाशांना सुरक्षेची राखी बांधत रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरं केलं. बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात या अनोख्या उपक्रमातून प्रवाशांना संदेश दिला.

बदलापूर रेल्वे स्थानकात अनेक दिशेने रेल्वे प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून येत असतात. थोडा वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी अनेक प्रवासी या जीवघेण्या मार्गाचा वापर करतात. यामुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात होऊन काही जणांना आपले जीव गमवावे लागले होते.

याबाबत जनजागृती करण्यासाठी योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात एक अनोखा उपक्रम राबवला. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी नववीतील विद्यार्थ्यांनी विविध संदेश देणाऱ्या राख्या बांधल्या.

चालत्या रेल्वेत चढू अथवा उतरू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका असे संदेश राख्यांवर लिहिले होते. बदलापूर रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या या उपक्रमात रुळ ओलांडणारे ज्येष्ठ, तरूण, विद्यार्थी आणि महिलांनाही या संदेश देणाऱ्या राख्या बांधण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांच्यात एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न होईल अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.