
मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजूनही संपलेलं नाही. वरचेवर या शपथविधीशी संबंधित नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे या शपथविधीच्या मागचं गूढ अधिकच वाढत आहे. या शपथविधीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेक धक्कादायक खुलासे केले. शरद पवार यांच्या संमतीनेच भाजप-राष्ट्रवादीच्या युतीचं ठरलं होतं. पण पवारांनी माघार घेतली. आमच्याशी विश्वासघात केला. त्यानंतर अजित पवार यांनीही या विधानाला दुजोरा दिला. तर शरद पवार यांनी हे विधान फेटाळून लावलं होतं. आता राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही9 मराठीला विशेष मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी भुजबळ यांची मुलाखत घेतली. यावेळी भुजबळ यांनी मनमोकळ्या गप्पा मारताना राजकीय वर्तुळाला हादरे देणारे खुलासेही केले. त्यामुळे राष्ट्रवादीत 2019मध्ये नेमकं काय चाललं होतं, याचा उलगडा झाला आहे.
2019मध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपसोबत संधान साधलं होतं. राष्ट्रवादी आणि भाजपने सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं. मंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंतची सर्व चर्चा झाली होती. शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारलं आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी हो म्हणून सांगितलं. त्यानंतर भाजपने अजित पवारांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा मै अजित पवार बोल रहा हूँ, जबान देता हूँ, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर भाजप राष्ट्रवादीचं सरकार बनणार होतं. पण ऐनवेळी शरद पवारांनी नकार दिला, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
त्यानंतर शरद पवार हे दिल्लीत गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. मी तुमच्यासोबत येण्याचा शब्द दिला होता. पण आता ते शक्य नाही असं पवारांनी मोदींना सांगितलं होतं, असं सांगतानाच अजित पवार यांनी धोका दिला नाही. अजित पवार यांनी पहाटेची शपथ घेऊन बंड केलं नाही. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. शरद पवारांनी धोका दिला की नाही हे तुम्ही ठरवा. पण देवेंद्र फडणवीस यांचं विधान खरं आहे एवढंच मी सांगू शकतो, असं म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
2019मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेसाठीच्या ज्या बैठका झाल्या त्या आम्हाला माहीत नव्हत्या. शरद पवार आणि अजित पवार यांनीच त्या चर्चा केल्या. फक्त दोन चार लोकांनाच ही चर्चा माहीत होती. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. जयंत पाटील यांनाही त्याची माहिती नव्हती, असं सांगतानाच अजितदादांनी केवळ दिलेला शब्द पाळला. म्हणूनच पहाटेचा शपथ विधी झाला. मी घरात पेपर वाचत असताना घरच्यांनी मला टीव्ही बघायला सांगितला.
तेव्हा अजितदादा आणि फडणवीस यांचा शपथविधी सुरू असल्याचं मी टीव्हीवर पाहिलं. सुरुवातीला मला वाटलं उद्धव ठाकरेंसोबत राष्ट्रवादीचा शपथविधी होतोय. त्यामुळे मी सारखं चॅनल बदलत होतो. पण सगळीकडे अजितदादा आणि फडणवीस यांचाच शपथविधी दाखवला जात होता. त्यानंतर मी कशी तरी आंघोळ केली आणि शरद पवारांना भेटलो. पवारांशी चर्चा केली अन् गेलेल्या आमदारांना गोळा करण्यास आम्ही सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.
फडणवीस यांनी राष्ट्रवादीने 2019मध्ये आमचा विश्वासघात केला असं म्हटलंय, याकडे संपादक उमेश कुमावत यांनी भुजबळांचं लक्ष वेधलं. त्यावर, फडणवीस त्यांच्या शब्दात आणखी काय म्हणू शकतील. ते तसंच म्हणतील. पण मी विश्वासघात हा शब्द उच्चारू शकत नाही. शरद पवार यांनी डिच केलं असं म्हणू शकतो. कारण मी शरद पवार यांना गुरू मानतो. शरद पवार सांगूनही भाजपसोबत गेले नाही हे खरं आहे. म्हणून अजित पवार भाजपसोबत गेले. शब्द खरा करण्यासाठीच अजितदादांनी ते पाऊल उचललं. ते बंड नव्हतं. सर्व काही आधीच ठरलेलं होतं. फक्त आम्हाला कुणालाच याबाबत माहीत नव्हतं, असंही त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचं ठरलं होतं असं भुजबळ यांनी सांगितलं. मात्र, पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची संमती नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी सरकार बनवण्याआधीच माघार घेतली होती. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीला पवारांची सहमती नव्हती. त्यावेळी शरद पवार यांची उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही चर्चा सुरू झाली होती. किती मंत्री आणि खाती घ्यायची हे सुद्धा ठरलं होतं. पण त्या बैठकीत खरगे आणि पवारांचं वाजलं. तेव्हा पवार रागाने बाहेर पडले. तिच संधी साधून अजितदादांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रपती राजवट उठवली आणि शपथविधी झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी भुजबळ यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना भाजपसोबत युती करण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी केला. मंत्रीपदं, खाती वगैरे सर्व गोष्टी ठरल्या होत्या. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील आणि अजित पवार यांनी चर्चा करायचंही ठरलं. कुठे जायचं वगैरे ठरलं. विमान तयार होतं. निघायच्यावेळी जयंत पाटील शरद पवार यांना भेटायला गेले. आम्ही जातो म्हणून त्यांनी पवारांना सांगितलं. त्यावेळी पवार यांनी जाऊ नको म्हणून सांगितलं, असं सांगतानाच भाजपसोबत जायचं नव्हतं तर शरद पवार वारंवार भाजपशी चर्चा का करत होते? असा सवाल भुजबळ यांनी यावेळी केला.