25 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, निरुपमांच्या भाच्यासह तिघांना अटक

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:14 PM, 28 May 2019
25 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, निरुपमांच्या भाच्यासह तिघांना अटक

मुंबई :  25 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवेमारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या भाच्याला अटक केली आहे. शशांक सुमन असं निरुपमांच्या भाच्याचं नाव आहे. मुंबई क्राईम ब्रांच युनिट 11 च्या पथकाने ही कारवाई करत शशांकसह तिघांना अटक केली. या तिघांचे बॉलिवूडशी संबंध आहेत. मात्र, हे सिनेमाक्षेत्र सोडून डॉन बनण्याच्या मार्गावर होते.

संजय निरुपम यांच्या भाचा शशांक सुमन हा त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून एका सिनेमा निर्मात्याला खंडणीसाठी धमकावत होता. बंगूर नगर परिसरात राहणाऱ्या प्रदीप कुमार प्रेम किशोर प्रसाद हे सिनेमा निर्माते आहेत, शशांक या निर्मात्याला 25 लाखाची खंडणी मागत होता. खंडणी न दिल्यास जीवेमारण्याची धमकीही त्याने दिली होती.

निर्मात्याला ज्या नंबरवरुन खंडणीसाठी फोन आला होता, त्याच्या व्हॉट्सअॅप डीपीवर छोटा राजन या कुख्यात गुंडाचा फोटो होता. त्यामुळे निर्माता घाबरला. पीडित निर्मात्याने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने याप्रकरणाचा तपास सुरु केला.

क्राईम ब्रांचच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावत शशांक सुमन, रोहन रेडकर आणि भुपेश प्रसाद या तिघांना अटक केली. पहिला आरोपी शशांक सुमन हा कॅमेरामन आहे. दूसरा आरोपी भूपेश प्रसाद टीव्ही सीरियलमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करतो तर तिसरा आरोपी हा शशांक आणि भूपेशसोबत राहातो.

बंगूर नगर पोलिसांनी 385, 387, 506 अंतर्गत या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे तिघे सिनेमा विश्वातून गुन्हेगारीकडे का वळले, याचा तपास पोलीस करत आहेत. शिवाय यांचा छोटा राजनसोबत यांचे काय संबंध आहेत, याचाही पोलीस तपास करत आहेत.

पिडीत प्रदीप कुमार प्रेम किशोर प्रसाद हे एक सिनेमा निर्माते आहेत. त्यांच्या नव्या सिनेमाचं शूटिंग काशिमिरा येथे सुरु आहे. या आरोपींना याची माहिती मिळाली आणि त्यांनी प्रदीप यांना फोन केला. त्यांनी प्रदीप यांना धमकी देत 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवेमारण्याची धमकी दिली. तसेच आमचा बॉस खूप मोठा माणूस आहे, असं सांगत प्रदीप यांना धमकावण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रदीप कुमार प्रेम किशोर प्रसाद यांनीमुंबई क्राईम ब्रांचच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. तसेच, आरोपी काण आहेत हे माहीत झाल्यावर मला धक्का बसला, हे तिघेही सिनेमा विश्वातील आहेत आणि हे अशारप्रकारे खंडणी मागत होते, अशी प्रतिक्रिया प्रदीप कुमार प्रेम किशोर प्रसाद यांनी व्यक्त केली.