नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, हळदीला हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी

| Updated on: Jun 27, 2020 | 1:53 PM

पनवेलजवळच्या नेरे गावात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. Haldi function corona

नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू, हळदीला हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी
Follow us on

पनवेल (रायगड) : नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पनवेलजवळच्या नेरे गावात लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात हजर राहिलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कारण नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, प्रशासन खडबडून जागं झालं आहे. (Haldi function corona)

गेल्या 14 जून रोजी नेरे गावातील पाटील कुटुंबाने मुलाच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर 23 जून रोजी नवऱ्या मुलाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची चाचणी करण्यात येणार आहे. तर नेरे परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. (Haldi function corona)

पहिल्या टप्यात 90 पैकी 27 जणांची चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित लोकांची चाचणी होणार आहे. दरम्यान 25 जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करु नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसंच लग्नासाठी तहसील कार्यालयातून परवानगी देण्यात येते, रितसर परवानगी घेऊन लग्नसोहळे करावेत असं प्रशासनाने बजावलं.

नवी मुंबईत 7 दिवस कडक लॉकडाऊन

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नवी मुंबई शहरात 44 ठिकाणी येत्या 29 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांचा असेल.  नवी मुंबईत कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. या भागात दररोज 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शहरात 24 जून रोजी तब्बल 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे

संबंधित बातम्या 

Navi Mumbai Lockdown | नवी मुंबईत 29 जूनपासून पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा