आधीच भाजप श्रेष्ठींची नाराजी, आता वडीलांच्या घोडचुकीने कृष्णराज महाडिकांना धक्का, धनंजय महाडिक यांचे ते वक्तव्य चर्चेत

Dhananjay Mahadik remarks on Krishnaraj Mahadik: अगोदरच भाजप पक्ष श्रेष्ठी कृष्णराज महाडिक यांच्यावर नाराज असल्याचे चित्र असतानाच काल कोल्हापूरातील दसरा चौकात एक घोडचूक झाली. दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांचे वडील धनंजय महाडिक यांच्या वाक्यानं रान उठलं, कृष्णराज महाडिकांना सुद्धा धक्का बसला. काय म्हणाले त्यांचे वडील?

आधीच भाजप श्रेष्ठींची नाराजी, आता वडीलांच्या घोडचुकीने कृष्णराज महाडिकांना धक्का, धनंजय महाडिक यांचे ते वक्तव्य चर्चेत
धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 06, 2026 | 9:54 AM

मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटवली, त्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि मनसेमध्ये जुंपली. मनसेच्या गडातच भाजयुमोने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याला मनसेने आक्रमक उत्तर दिले. या सर्व प्रकारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे कान टोचले. त्यांना कानमंत्र दिला. हा वाद शमत नाही तोच काल कोल्हापूरातील दसरा चौकात त्यांचे वडील धनंजय महाडिक यांच्याकडून एक घोडचूक झाली. दहीहंडी उत्सावात ते असं काही बोलून गेले की, अनेकांसह कृष्णराज महाडिक यांच्यासह भाजपलाही धक्का बसला. अनवधानाने केलेले हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.

स्लीप ऑफ टंगची जोरदार चर्चा

कोल्हापूरातील दसरा चौकात दहीहंडीचा कार्यक्रम सुरू होता. त्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक काय बोलतात यासाठी तरुणाई, समर्थक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोलण्याच्या ओघात धनंजय महाडिक यांना आपला मुलगा कोणत्या पक्षाच्या संघटनेचे नेतृत्व करत आहे, याचा जरा विसर पडला. त्यांच्या या स्लीप ऑफ टंगची मग राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

भाषणाच्या ओघात धनंजय महाडिक यांनी कृष्णराज महाडिक यांना महाराष्ट्र काँग्रेस युवक अध्यक्ष करून टाकले. पुत्रप्रेम आणि धावत्या समालोचनात त्यांची स्लीप ऑफ टंग झाले हे सर्वांनाच कळाले. पण त्यांच्या वक्तव्याची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. मुलगा कृष्णराज महाडिक हा भाजयुमोचा प्रदेशाध्यक्ष आहे, याचा भाषणाच्या ओघात त्यांना विसर पडला. “आज कृष्णराज महाडिक यांना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष…इतकी मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी विश्वास टाकला आहे.” असे ते बोलून गेले.

काँग्रेसच्या प्रतिक्रियेची उत्सुकता

आता सर्वात मोठी कडी म्हणजे ही चूक त्यांना मंचावर बसलेल्या एकाने लक्षात आणून दिली नाही. बोलण्याच्या ओघात धनंजय महाडिकांनाही ही चूक काही लक्षात आली नाही. कोल्हापूरच्या जनतेने महाडिक कुटुंबाला खूप काही दिले हे सांगत असताना आपण काय बोलून गेलो हे त्यांच्या ध्यानीमनी आले नाही. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली नाही. काँग्रेस नेते त्यावर मिश्किल प्रतिक्रिया देतात की थेट ऑफर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us