
DCM Eknath Shinde: राज्यात महायुती 2 सरकारचे कामकाज आजपासून सुरु झाले. या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आहेत. महायुतीचे सरकार अस्तित्वात येण्यास बारा दिवस लागले. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सुरु होत्या. त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास तयार नव्हते. गुरुवारी दुपारी तीन वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत त्यांच्या शपथविधीबाबतचे पत्र घेऊन राजभवनात गेले. संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. नाराजीनाट्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून मी नाराज होता, अशा बातम्या सुरु होत्या. मी आजारी होतो. त्यामुळे गावी गेलो होतो. माझी भूमिका 27 तारखेला स्पष्ट केली होती. त्यानंतर नाराजीच्या बातम्या सुरु होत्या. मग श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? ही चर्चा सुरु झाली. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका सांगितली. त्यानंतरही चर्चा थांबत नाही. तुम्ही आता या चर्चा बंद केल्या पाहिजे.
देवेंद्र फडणीस यांनी मला अडीच वर्षे सहकार्य केले. आता मी त्यांना सहकार्य केले. अडीच वर्षांत आम्ही अनेक निर्णय घेतले. इतक्या कमी कालावधीत जितके निर्णय आमच्या सरकारने घेतले ते ऐतिहासिक आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यामुळे आम्ही ४० चे ६० झालो आहेत. हिच आमच्या कामाची पावाती आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
जनतेने आमच्या अडीच वर्षांच्या कामाची पावती आम्हाला दिली. बाळासाहेबांची विचारधारा आम्ही पुढे नेली. विकासाचा अजेंडा आम्ही चालवला. आधी मी स्वत:ला कॉमन मॅन समजत होतो. कार्यकर्ता होतो. आता उपमुख्यमंत्री म्हणून 24X7 जनतेसाठी असणार आहे. ‘डेडिकेट कॉमन मॅन’ म्हणजे डीसीएम असणार आहे. विरोधकात आता विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही. लाडक्या बहिणींचे भरभरुन प्रेम आम्हाला दिले. त्यांना विशेष धन्यवाद दिले पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.