तुम घाटी लोग सुधरोगे नही… प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, नंतर जे घडलं ते…

मुंबईतील रहेजा होम्सचे मालक सुशील रहेजा यांनी मराठी शिपायाला 'घाटी' म्हणत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. गोवंडी पोलिसांनी याप्रकरणी कठोर पावले उचलत गुन्हा नोंदवला असून, या घटनेचे मुंबईत तीव्र पडसाद उमटत आहेत.

तुम घाटी लोग सुधरोगे नही... प्रसिद्ध बिल्डरकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, नंतर जे घडलं ते...
Sushil Raheja FIR
| Updated on: Feb 03, 2026 | 1:41 PM

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद प्रचंड विकोपाला गेला आहे. त्यातच आता मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसाचा अपमान आणि जातीवाचक द्वेषाची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि रहेजा होम्सचे मालक सुशील रहेजा यांनी आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी शिपायाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी रहेजा यांच्यावर ॲट्रोसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवर असलेल्या रहेजा होम्सच्या मुख्य कार्यालयात शिपाई म्हणून काम करत होता. या घटनेच्या दिवशी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीत सुशील रहेजा यांनी काही कागदपत्रे मागवली होती. तक्रारदाराने ती कागदपत्रे दिली. मात्र त्या कागदपत्रांना नीट स्टॅपल केलेले नव्हते. मराठी शिपायाची ही छोटीशी चूक सुशील रहेजा यांना सहन झाली नाही.

कागदपत्रे विस्कटल्याने सुशील रहेजा यांना राग अनावर झाला. त्यांनी बैठकीतच संबंधित तरुणाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी तुम घाटी लोग सुधरोगे नही, तुमची लायकी हीच आहे अशा शब्दात त्या तरुणाचा आणि त्याच्या जातीचा अपमान केला. पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, रहेजा यांनी त्याचा अपमान करण्यासाठी मुद्दामहून सर्वांसमोर जातीवाचक टिप्पणी केली, जेणेकरून त्याला मानसिक त्रास होईल.

यावेळी त्या शिपायाने केवळ मारहाणीचाच नाही, तर मानसिक छळाचाही आरोप केला आहे. मी एका विशिष्ट मागासवर्गीय समाजाचा असल्याने मला कामावरून कायमचे काढता यावे आणि पुन्हा नोकरी मागू नये, या उद्देशाने सुशील रहेजा यांनी कार्यालयात भेदभावपूर्ण वातावरण निर्माण केल्याचा दावा तक्रारीत केला आहे.

गुन्ह्याची नोंद

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोवंडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवला आहे. सुशील रहेजा यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम ११५ (स्वच्छेने दुखापत करणे), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act) या कायद्यातील विविध कलमांनुसार जातीवाचक शिवीगाळ आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईतील एका मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे खालच्या थराची वागणूक दिल्याने सोशल मीडियावर रहेजा यांच्या विरोधात मोहीम सुरू झाली आहे. पोलीस आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि बैठकीला उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.