गणेश नाईक यांच्या बंगल्याला आग, मोठी खळबळ

वनमंत्री गणेश नाईक यांच्या मंत्रालयासमोर असलेल्या 'पावनगड' शासकीय बंगल्याला भीषण आग लागली. सकाळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात धुराचे लोट उठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र आगीचे कारण आणि नुकसानीचा अंदाज अद्याप स्पष्ट नाही.

गणेश नाईक यांच्या बंगल्याला आग, मोठी खळबळ
Ganesh Naik Pavangad bungalow
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 11, 2026 | 12:27 PM

राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या पावनगड या शासकीय बंगल्याला आग लागली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलीसही तातडीने या परिसरात आले. अग्निशमन दलाचे जवान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आग अत्यंत भीषण असून परिसरात धुराचे लोट उठले आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत असल्याचं सांगितलं जात आहे.

वन मंत्री गणेश नाईक यांचा हा बंगला आहे. मंत्रालयाच्या समोरच असलेल्या त्यांच्या पावनगड या शासकीय बंगल्याला आज सकाळी 11.45 च्या सुमारास आग लागली. बंगल्याला आग लागल्याचं कळताच एकच खळबळ उडाली. बंगल्यातील लोक सैरावैरा धावत बाहेर आले. ही आग अत्यंत भीषण आहे. बघता बघता आगीचे तांडव सुरू झालं. धुराचे लोटही उठले आहेत. संपूर्ण परिसर धुराने व्यापून गेल्याने सर्वच हादरून गेले. आगीची घटना घडताच तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही.

Loading...

बंगल्याचं नुकसान किती?

दरम्यान, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. आग लागली तेव्हा बंगल्यात कोण कोण होतं याची माहिती समोर आली नाही. तसेच बंगल्यात कोणी अडकलंय का? याचीही माहिती समोर आलेली नाहीये. आगीमुळे किती नुकसान झालंय हे सुद्धा समोर आलेलं नाही. अग्निशन दलाचे जवान अद्याप आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आहे. या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

आग लागली कशी?

या आगीबाबत अजून कुणीही अधिक माहिती दिलेली नाही. मंत्री गणेश नाईक यांनीही आगीबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. तसेच आग नेमकी कशामुळे लागली? याचं कारण समजू शकलं नाही. मंत्रालयासमोरचा हा परिसर अत्यंत शांत परिसर आहे. या ठिकाणी आग लागली कशी? याचं गूढ वाढलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us