भायखळ्यात मोठी दुर्घटना! 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, 5 जण गंभीर जखमी, व्हिडीओ समोर

मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या एका 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली आहे. या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमकं काय आणि कधी घडलं, त्याबद्दल जाणून घ्या..

भायखळ्यात मोठी दुर्घटना! 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली, 5 जण गंभीर जखमी, व्हिडीओ समोर
इमारतीची लिफ्ट कोसळली
Image Credit source: ANI
| Updated on: Feb 12, 2026 | 10:12 AM

मुंबईतील भायखळा पूर्व इथल्या जयकृपा टॉवरमध्ये बुधवारी (11 फेब्रुवारी, 2026) रात्री उशिरा अत्यंत भीषण घटना घडली. या 18 मजली इमारतीची लिफ्ट कोसळली असून या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. केबल बिघाडामुळे चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावर असताना अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती थेट खाली कोसळली. भायखळा पूर्व इथल्या घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक 1 जवळ ही इमारत आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टच्या केबलमध्ये बिघाड झाली होती. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून ती वेगाने खाली कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये पाच रहिवासी होते, या सर्व रहिवाशांना दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. जखमींपैकी तिघांना जेजे रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात आणि आणखी एकाला जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेनंतर लिफ्टच्या सुरक्षेचा आणि देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी पोलीस आणि इतर संबंधित विभाग पुढील चौकशी करत आहेत.

खाली उतरण्यासाठी इमारतीमधील पाच रहिवासी या लिफ्टमध्ये चढले होते. लिफ्ट खाली जात असताना अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि काही क्षणांतच ही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून प्रचंड वेगाने थेट ग्राऊंड फ्लोअरला कोसळली. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज ऐकताच इमारतीमधील आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी बेसमेंटकडे धाव घेतली. आत अडकलेले लोक मदतीसाठी ओरडत होते आणि याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात आले आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं. लिफ्टची देखभाल, नियमित सुरक्षा तपासणी आणि परवानग्या यांच्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडून तपासली जाणार आहेत. नेमकी जबाबदारी कोणाची आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.