नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो आणणार, आराखडा तयार : मुख्यमंत्री

| Updated on: Jun 28, 2019 | 8:41 PM

यासाठीचा आराखडा तयार केला असून लवकरच प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी विधानसभेत बोलताना दिली. प्रयोग यशस्वी झाल्यास हायब्रीड मेट्रोचं रुपांतर मेट्रोमध्ये करण्यात येईल. मेट्रो आणि हायब्रीड मेट्रो यांच्या किंमतीत मोठा फरक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो आणणार, आराखडा तयार : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना खुशखबर दिली आहे. नाशिकमध्ये लवकरच हायब्रीड मेट्रो आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. यासाठीचा आराखडा तयार केला असून लवकरच प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी विधानसभेत बोलताना दिली. प्रयोग यशस्वी झाल्यास हायब्रीड मेट्रोचं रुपांतर मेट्रोमध्ये करण्यात येईल. मेट्रो आणि हायब्रीड मेट्रो यांच्या किंमतीत मोठा फरक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांबाबत माहिती दिली. मुंबई शहरात 1.16 लाख कोटी रुपयांचं काम सुरु आहे. यापैकी तीन मार्गिका 2021 आणि 2022 अशा दोन टप्प्यात सुरु होतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापूर्वी एमएमआरडीएचं क्षेत्र 3965 चौरस किमी होतं, जे आता 4355 चौरस किमी करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नाशिकमध्ये हायब्रीड मेट्रो आणण्यासाठी काम सुरु आहे. त्याचा आराखडाही तयार झालाय. हायब्रीड मेट्रोचं मेट्रोमध्ये रुपांतर करणं सहज शक्य आहे. दोन्ही मेट्रोच्या किंमतीमध्ये मोठा फरक आहे. हायब्रीड मेट्रोसाठी प्रति किमी 50 कोटी, तर मेट्रोसाठी प्रति किमी 275 कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वसई-भाईंदर मार्गासाठीही काम केलं जात आहे. शिवाय ट्रान्सहार्बर लिंकचं काम वेगाने सुरु आहे. विरार-अलिबाग यांसारख्या मल्टीमॉडेल कॉरिडॉरमुळे मोठा फायदा होणार आहे. विकास प्रक्रियेमध्ये या प्रकल्पांचा मोठा हातभार असेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या कामासाठी एमएमआरडीए, सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी यांना अत्यंत कमी दरात कर्ज मिळत आहे. नवी मुंबईतील नैना प्रकल्पाच्या पहिल्या विकास आराखड्याला मान्यता दिली आहे, दुसऱ्यावरही काम सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दमनगंगा-पिंजल प्रकल्पामुळे मुंबईच्या 2060 पर्यंतच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटणार आहे. यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम वेगात सुरु आहे. यामध्ये आता कोणताही अडथळा येणार नाही. कारण, सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. या स्मारकाचं काम 2020 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.