मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. रागाच्या भरात एखादा शब्द तोंडातून गेला असला तरी, कोर्टाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील राजकीय परिस्थिती आणि अन्यायामुळे मनात चीड येते असे सांगत, त्यांनी कोर्टाने लोकशाहीचे रक्षण करावे आणि देशाला न्याय द्यावा असे आवाहन केले.

माझ्या आयुष्यात मी कधीच कोर्टाचा अवमान केला नाही. रागात एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल. पण कोर्टाचा अवमान करणं हा कधीच हेतू नव्हता. माझ्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडत आहेत. ते पाहून मन अस्वस्थ होतं. चीड येते. मलाच नाही, देशातील लाखो लोकांमध्ये ही चीड आहे. त्याच रागातून एखादा शब्द तोंडून गेला असेल तर मी माफी मागतो. एकदा नाही, मी दहादा सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याविरोधात विधान केलं होतं. त्याची दखल घेऊन कोर्टाने राऊत यांनी स्पष्टीकरण मागितलं आहे. त्यावर राऊत यांनी मीडियासमोर कोर्टाची सपशेल माफी मागितली आहे. सुप्रीम कोर्टात पीटीशन दाखल आहे. आमच्याकडून चूक झाली असं कोर्टाला वाटत असेल तर तो सरन्यायाधीशांना अधिकार आहे. कोर्टाच्या विरोधात अवमानकार विधान केलं तर त्याची ते दखल घेतात. त्यावर कंटेम्प्ट करतात. स्पष्टीकरण मागतात. माझ्या विरोधात कोर्टाची अशी भावना असेल तर मला खेद आहे. कोर्टाची माफी मागायला मला जराही खेद नाही. मी कोर्टाची माफी मागत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
लोकशाही वाचवण्याची जबाबदारी तुमची
आम्हाला न्याय पाहिजे. देशाला न्याय पाहिजे. 12 ते 13 कोटी लोकांचे नावं एसआयआरच्या नावाने मतदार यादीतून डीलिट केले आहेत. त्यांना न्याय हवा. आमचं पक्ष फोडला. ज्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा व्यक्तीला आमचा पक्ष आणि चिन्ह दिलं. आम्ही चार वर्षापासून लढत आहोत. आम्हाला न्याय हवा. त्यामुळे आमच्या मनातून चीड येते. या रागातून बोलण्याच्या भरात काही चुकीचा शब्द निघाला असेल तर मी दहादा तुमची माफी मागतो. पण या देशाची लोकशाही वाचवण्याची जबाबदारी तुमची आहे. शेवटपर्यंत आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. तुम्ही संविधानाचे रक्षक आहात. तुमच्याबाबत काही चुकीचं होऊ नये, असं आम्हाला वाटतं, असंही राऊत म्हणाले.
दबावात येऊ नका
देशातील जे वातावरण आहे, अराजकता निर्माण झाली आहे. ती रोखण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयात आहे. काल सरन्यायाधीशांनी सांगितलं की, आम्ही दबावात येणार नाही. आम्हाला तेच हवं. कोणत्याही दबावात येऊ नका. बाहेर जे राजकारण सुरू आहे. मोदी आणि शाह ज्या पद्धतीने बोलत आहेत, कोणत्याही पक्षाला फोडलं जात आहे, कुणालाही अध्यक्ष बनवलं जातं. संवैधानिक संस्थांचे आम्हीच मालक असल्याचं दाखवलं जात आहे, म्हणून आम्हाला राग येतो. त्यामुळे तोंडून काही शब्द निघून जातात. कोर्ट महानायक आहे. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडून उभं राहणार आहोत. आम्ही तुमच्याकडे न्याय मागणार नाही तर कुणाकडे मागणार? राहुल गांधींच्या नेतृत्वात लाखो लोक कोर्टात आले, ते त्यासाठीच आले. तुमच्याकडे न्याय मागायलाच आले. आमच्याकडून काही चूक झाली तर माफ करा, असं राऊत यांनी म्हटलंय.
देश तुमच्याकडे न्याय मागतोय
पण न्याय द्या. देश तुमच्याकडे न्याय मागत आहे. देश तुमच्याकडे पाहत आहे. आम्ही सर्व तुमच्याकडे पाहत आहोत. मी आयुष्यात कधीच कोर्टाचा अवमान केला नाही. रागात काही शब्द इकडे तिकडे जातात. देशात राग आहे. लोकांमध्ये चीड आहे. माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी पाहून कुणालाही राग येईल. मलाही राग येतो. काल अंकिता भंडारीचे आईवडील इंडिया गेटवर बसले. तिकडे कुणाचं लक्ष जात नाही. ज्यावर हत्येचा आरोप आहे, त्याला राज्यपाल बनवलं आहे. त्याला संवैधानिक संरक्षण दिलं आहे. त्यावर कोणी बोलत नाही. या देशात असं होत आहे. त्यामुळेच सामान्य लोकांना संताप येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.