
रविवार म्हटलं की मासांहारी प्रेमींचा आवडता दिवस. पण गेल्या काही दिवसांपासून मासळी बाजाराची शान असलेल्या मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अरबी समुद्रातील वादळसदृश परिस्थितीने कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय थंडावला आहे. गेले आठ दिवस एकही बोट समुद्रात न गेल्याने माशांची आवक पूर्णपणे थांबली आहे. ज्यामुळे बाजारातील माशांची आवक पूर्णपणे थंडावली आहे. सध्या सामान्य दरांच्या तुलनेत माशांचे दर दुप्पट ते तिप्पट झाल्याने मासे खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अरबी समुद्रात सध्या अतिवृष्टीसह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने खोल समुद्रात गेलेल्या शेकडो नौका तातडीने किनाऱ्यावर परतल्या आहेत. सिंधुदुर्गातील देवगड बंदरात स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांनी आश्रय घेतला आहे. प्रतिकूल हवामानामुळे गेल्या आठ दिवसांपासून मच्छिमार नौका समुद्रात जाऊ शकलेल्या नाहीत. परिणामी मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.
यामुळे रविवारी माशांवर ताव मारण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांच्या ताटातले मासे गायब झाले आहेत. अनेक नागरिक हे नाइलाजाने रिकाम्या हाताने परतल्याचे पाहायला मिळत आहे.
| मासा | पूर्वीचा दर (रु.) | सध्याचा दर (रु.) | वाढ (अंदाजित) |
| सुरमई | ₹ ५०० | ₹ ८०० ते ₹ १२०० | ६०% ते १४०% |
| पापलेट | ₹ ७०० | ₹ ९०० ते ₹ १५०० | २८% ते ११४% |
| बांगडा | ₹ १५० | ₹ २५० ते ₹ ३०० | ६६% ते १००% |
| कोळंबी | ₹ २०० | ₹ २५० | २५% |
| सरंगा | ₹ ३५० | ₹ ५०० | ४२% |
| मोडोसा | ₹ ३५० | ₹ ४५० | २८% |
समुद्रातील वादळसदृश स्थितीबरोबरच गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे कोकणात रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. पुण्याहून भोरमार्गे महाड (कोकण) ला जोडणारा महत्त्वाचा वरंध घाट मार्ग चिखलमय झाला आहे. तर भोर तालुक्यात रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे, रस्तारुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मातीचा मोठा खच मुख्य रस्त्यावर आला आहे. तसेच देवघर ते वेणूपुरी दरम्यानचा रस्त्याचे पूर्णपणे चिखलात रूपांतर झाले आहे.
या चिखलामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरत आहेत. तर मोठे मालवाहू ट्रक आणि बस मातीत रुतून बसल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी क्रेन आणि जेसीबीच्या मदतीने ही वाहने बाहेर काढावी लागत आहेत. यामुळे प्रवाशांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काम पूर्ण होईपर्यंत तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.