एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? आमदारानंतर दोन मंत्र्याचं थेट विधान; राज्यात मोठ्या घडामोडी?

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिंदे गटातील आमदार किशोर दराडे, मंत्री प्रताप सरनाईक आणि गुलाबराव पाटील या तीन प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली आहे. संख्याबळ वाढवून शिंदे यांना मुख्यमंत्री बनवणार असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत असून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? आमदारानंतर दोन मंत्र्याचं थेट विधान; राज्यात मोठ्या घडामोडी?
eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 12:09 PM

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. आता हे सर्व आमदारांच्या हातात आहे, असं विधान शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी केलं होतं. दराडे यांच्यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनीही एकनाथ शिंदे यांना संख्याबळ वाढवून मुख्यमंत्री करणार, असं विधान केलं आहे. तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक आमदाराची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. एकाच दिवशी तीन नेत्यांनी थेट विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दसरा मेळाव्याच्या आधीच शिंदे गटातून मोठी मागणी होत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत.

प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार आहोत. सध्या आमचं संख्याबळ कमी असल्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. येणाऱ्या काळात आम्ही आमचं संख्याबळ वाढवू आणि शिंदेंना मुख्यमंत्री करू, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांना अजून बराच वेळ असतानाही शिंदे गटातून मुख्यमंत्रीपदावर भाष्य करण्यात येत असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Loading...

तेव्हा शिंदे बाहेर होते

टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यानंतर एकनाथ शिंदे त्याला भेटायला गेले. पण प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यानंतर शिंदेंना पूर्णेकर कुटुंबीयांना भेटायला वेळ मिळाला नाही, असा संताप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यावर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंच्या आदेशानंतर मी पूर्णेकर कुटुंबाकडे गेलो आणि तिथे गेल्यावर पूर्णेकर कुटुंबाचं शिंदेंशी बोलणं करून दिलं होतं. मात्र, विरोधकांकडून हे जाणूनबुजून केलं जात आहे. हत्या झाली, तेव्हा शिंदे बाहेर होते. तुमच्यात हिंमत असेल, तर शेतकऱ्यांना मदत करतोय तिथे या आणि मदत करा. घरात बसून राजकारण करत आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली आहे.

आव्हाडांनाच का धमक्या येतात?

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना वारंवार धमक्या येत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जितेंद्र आव्हाड यांनाच वारंवार धमक्या का येतात? मला धमकी येत नाही, मात्र आव्हाड यांच्याबाबत धमक्यांचं सत्र सुरू आहे. या धमक्यांची चौकशी झाली पाहिजे. गरज पडल्यास त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे, असं सरनाईक म्हणाले.

दराडे काय म्हणाले?

किशोर दराडे यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे. पण शिंदेंना मुख्यमंत्री करायचे की नाही हे शेवटी आमदारांच्या हातात आहे, असं किशोर दराडे म्हणाले आहेत.

गुलाबराव पाटीलही तेच म्हणाले…

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही आमची भावना आहे. तशी प्रत्येक आमदाराची भावना आहे, असं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us