Positive news | महाराष्ट्रासाठी सकारात्मक बातमी, वयाची शंभरी ओलांडलेल्या तिघांनी कोरोनाला हरवलं

| Updated on: Apr 26, 2021 | 6:13 PM

महाराष्ट्रातील अहमदनगर आणि लातूर या दोन शहरात शंभरी पूर्ण केलेल्या तिघांनी कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra three people cross age of 100 beat Corona)

Positive news | महाराष्ट्रासाठी सकारात्मक बातमी, वयाची शंभरी ओलांडलेल्या तिघांनी कोरोनाला हरवलं
corona patient negative
Follow us on

अहमदनगर : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकलेला असताना अनेक सकारात्मक बातम्याही समोर येत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर आणि लातूर या दोन शहरात शंभरी पूर्ण केलेल्या तिघांनी कोरोनावर मात केली आहे. यात एक दाम्पत्य आणि एका आजींचा समावेश आहे. हे तिघेही ठणठणीत बरे होऊन त्यांच्या घरी गेले आहेत.  (Maharashtra Positive news three people cross age of 100 beat Corona)

अहमदनगरमध्ये शंभरी गाठलेल्या आजींची कोरोनावर मात 

अहमदनगरमधील प्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब डोके यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई डोके यांना काही दिवसांपूर्वी कोरोनासदृश लक्षण दिसू लागली. त्यानंतर त्यांनी चाचणी केली असता, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांना साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लक्ष्मीबाई यांनी काही दिवसांपूर्वी वयाची शंभरी गाठली होती. कोरोना काळात वयोमानानुसार त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र साईदीप रुग्णालयातील डॉ. दीपक यांनी त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेत त्यांच्यावर उपचार केले. अवघ्या 15 दिवसांच्या उपचारानंतर लक्ष्मीबाईंचा रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आला. त्यानतंर त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या.

लातुरात शंभरी ओलांडलेल्या दाम्पत्याने कोरोनाला हरवलं 

तर दुसरीकडे लातूर ग्रामीण काटगाव तांडा (कृष्णानगर) या ठिकाणी राहणारे 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षाच्या आजी यांनी कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनावर मात केली. या दाम्पत्याने अवघ्या सात दिवसात कोरोनाला हरवलं आहे.

काटगाव तांडा या ठिकाणी राहणाऱ्या धेनू उमाजी चव्हाण (105) आणि मोताबाई चव्हाण (95) या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनाला न घाबरता योग्य ते उपचार सुरु केले. यानंतर अवघ्या काही दिवसात ते दोघेही कोरोनामुक्त झाले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांनी कोरोनावर उपचार घेतले. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. तसेच डॉक्टरांचे आभारही मानले.

धीरज देशमुखांचे ट्वीट 

माझ्या मतदारसंघातील काटगाव तांडा (कृष्णानगर) येथील 105 वर्षांचे धेनू उमाजी चव्हाण आणि 95 वर्षांच्या मोताबाई चव्हाण या दाम्पत्याने वेळेवर उपचार घेऊन आज कोरोनावर मात केली. सध्याच्या वातावरणात वाचायला मिळालेली ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे.

चव्हाण दाम्पत्यासह इतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र झटणारे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सर्व डॉक्टर, परिचारिका यांचे मी आभार मानतो. नागरिकांनाही माझी विनंती आहे, कोरोनाची लक्षणे असतील तर चव्हाण दाम्पत्याप्रमाणे तातडीने तपासणी करून उपचार घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्यात आणि देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र या दोन्ही घटनांमुळे नक्कीच कोरोनाबाधित रुग्णांना लढण्याचे बळ मिळेल. तसेच राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Positive news three people cross age of 100 beat Corona)

संबंधित बातम्या : 

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

अभी ज़रा बाज़ आएँ।, संजय निरुपमांनी राष्ट्रवादीला फटकारले; मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून जुंपली