त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे सर्व भाजपचेच, शिंदे गटाने हात झटकले; रामदास कदम थेटच म्हणाले…

कुणाच्या सांगण्यावरून ही क्लिप केली का? हे पाहिलं पाहिजे. जरांगेंनी आरोप करण्याऐवजी शिंदेंना क्लिप दाखवायला हवी होती. या क्लिपनंतरही शिंदे आणि जरांगे यांच्या अनेक भेटी झाल्या. पण क्लिपमधील गोष्टी गंभीर आहेत. त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडेही 32 मिनिटांची क्लिप आहे, असं शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे सर्व भाजपचेच, शिंदे गटाने हात झटकले; रामदास कदम थेटच म्हणाले...
ramdas kadam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 2:13 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज एक 32 मिनिटाची ऑडिओ क्लिप व्हायरल करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. या क्लिपमध्ये एक महिला मनोज जरांगेंना मॅनेज करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं म्हणत आहे. या क्लिपमध्ये तीनचार व्यक्तींचं संभाषण आहे. क्लिप व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. त्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी यावर प्रतिक्रिया देताना क्लिपमधील सर्व लोक भाजपचे आहेत. आमचा संबंध काय? असं म्हणत हात झटकले आहेत. शिंदे गटाने या प्रकरणातून हात झटकून सर्व खापर भाजपवर फोडलं आहे. त्यामुळे आता भाजपमधून त्यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला न्याय देण्यात एकनाथ शिंदेंचं योगदान मोठं आहे. जरांगेंना एक गोष्ट लक्षात आणून देतो. त्यांनी हवं तर विनोद पाटलांना विचारावं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास कुणाच्या बंगल्यावर झाला? हे विनोद पाटलांना विचारा. ते सांगतील, असं रामदास कदम म्हणाले.

Loading...

शेंडा नाही, बुंधा नाही

आम्ही पडद्याच्या आड आहोत. दोन दोन वर्ष, अडीच वर्ष या क्लिपला झाली. आता कशी बाहेर आली? विधानसभा झाली, लोकसभा झाली. तेव्हा ही क्लिप का आली नाही? अर्थात त्यात तीन चार लोक बोलत आहेत. ते भाजपचेच आहेत. त्याबद्दल दुमत नाही. मी स्पष्ट सांगतो. मी ती क्लिप ऐकली आहे. हे लोक कॉन्फरन्स कॉलवर बोलत आहेत. यात छत्रपती संभाजीनगर, ठाणे कनेक्शन आहे. मुंबईचंही कनेक्शन आहे. उद्या कोणीही कॉन्फरन्स कॉलवर म्हणू शकतो, याला हजार कोटी दिले… त्याला दोन हजार कोटी दिले… त्याला शेंडा आणि बुंधा नाहीये ना? मग दोन अडीच वर्ष आपण का थांबला होता? असा सवाल करतानाच आपल्या समाजाच्या नेत्यावर अशा पद्धतीने काही मंडळी आरोप करून बदनाम करत असतील तर जरांगे तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभं राहायला हवं होतं, असं मतही रामदास कदम यांनी व्यक्त केलं.

अमित शाहांना भेटणार

ही तीन वर्ष जुनी क्लिप असली तरी त्याची चौकशी झाली पाहिजे. ती महिला कोण आहे? ते समोर आलं पाहिजे. पैसे कुठे दिले हे समोर आलं पाहिजे? त्या महिलेकडे 500 कोटी कुठून आले? ते समोर आलं पाहिजे. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी क्लिप करण्यात येत असेल तर समाजाने एकत्र येऊन ते षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. मी आजच शिंदेंना भेटून यावर चर्चा करणार आहे. मी अमित शाह यांना निवेदन देणार आहे. या क्लिपची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असं ते म्हणाले.

भाजपचा बडा नेता नाही

या क्लिपची चौकशी झाल्यावर सर्व गोष्टी पुढे येतील. ही अडीच वर्षापूर्वीची क्लिप आहे. दोन तीन लोक बोलत आहेत. त्यात भाजपचा कोणताही मोठा नेता नाही. ही क्लिप केवळ शिंदेंना बदनाम करण्यासाठीच केली होती का? हे चौकशीत समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us