महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, कारण काय?

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघेही भेटणार असून, त्यांच्या भेटीमुळे मनसे आणि ठाकरे गटातील युतीची चर्चा रंगली आहे. २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. या भेटीचा राजकीय परिणाम काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, कारण काय?
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Aug 24, 2025 | 1:26 PM

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आले. यामुळे अनेकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. येत्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाची युती होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंकडून वारंवार एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे बोललं जात आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब दादरमधील कृष्णकुंज या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी यावे, असे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरेंनीही हे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे समजत आहे.

कधी-किती वाजता भेटणार?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोन कॉलमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याने ठाकरे बंधू गणेशोत्सवादरम्यान एकत्र येण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवादरम्यान हे दोन नेते एकत्र येणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढली

गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ५ जुलै २०२५ रोजी दोन्ही भाऊ एकाच मंचावर दिसले होते. यानंतर २७ जुलै २०२५ रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे त्यांच्यातील बंधू प्रेम हे स्पष्ट पाहायला मिळत होते. त्यातच गेली अनेक वर्षे ठाकरे कुटुंबाने एकत्र सण साजरे केलेले नाहीत. त्यामुळे या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र येऊन गणपती दर्शन करेल, असे बोललं जात आहे. मात्र यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us