MNS : मनसेला मुंबईत मोठा धक्का, विश्ववक्रमी दहीहंडीमुळे फेमस झालेल्या नेत्याला अक्षय कुमारच्या बहिणीची फसवणूक केल्या प्रकरणात अटक
MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. दहीहंडी उत्सवामुळे प्रसिद्ध झालेल्या नेत्याला बिल्डर फसवणूक प्रकरणात अटक झाली आहे.

कृष्णा सोनारवाडकर , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील मनसेचे बडे नेते, विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांना अटक करण्यात आली आहे.पवई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हिरानंदानी परिसरातील विकासकाशी संबंधित फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. गणेश चुक्कल यांना दहीहंड उत्सवामुळे ओळख मिळाली. त्यांनी यंदा घाटकोपरमध्ये काही लाख रुपयांची दहीहंडी बांधली होती. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली, त्यावरुन वादही झाला होता. हिरानंदानी समूहाच्या संचालिका अलका भाटिया ऊर्फ हिरानंदानी यांनी तक्रार दिली होती. गणेश चुक्कल ज्या इमारतीत राहतात, त्याच बिल्डिंगमध्ये अलका भाटिया यांची बनावट सही करुन फ्लॅट भाड्यावर दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
हिरानंदानी ग्रुपच्या संचालिका अलका भाटिया उर्फ अलका हिरानंदानी यांच्या स्वाक्षरीची बनावट केल्याचा आरोप. अलका हिरानंदानी या अभिनेता अक्षय कुमारच्या बहिण आहेत. फ्लॅट नं. 3505, ओडोनियो बिल्डिंगसाठी 30 वर्षांची बनावट लीज डीड तयार केल्याचा आरोप आहे. पवई पोलिसांनी गणेश अर्जुन चुक्कल याला 2 ऑक्टोबरला अटक केली. चुक्कल विरोधात C.R. No. 978/2022 नुसार IPC कलम 420, 465, 467, 471 अंतर्गत गुन्हा. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. पुढील तपासासाठी पवई पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू.
पोलीस कोठडी सुनावण्यात आली
गणेश चुक्कल यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना पाच ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश चुक्कल यांच्याविरोधात या प्रकरणात 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास सुरु होता. अखेर त्यांना आता अटक झाली. हिरानंदानी परिसरातील विकासकाने गणेश चुक्कल यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती.
पवई पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवण्यात आले
त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित आरोप गणेश चुक्कल यांनी यापूर्वी फेटाळले होते. या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन नोंदींमध्ये हिरानंदानी समूहाशी संबंधित मालमत्ता आणि कराराचा वादही नमूद आहे. ऑक्टोबर 2024 मधील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात गणेश चुक्कल यांचा संबंधित फ्लॅटच्या ताब्याशी निगडित वादातील पक्षकार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.