मुंबई विमानतळावर मोठी खळबळ, विमानाच्या शौचालयात जे सापडलं ते पाहून पोलीसही चक्रावले
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या विशेष कारवाईचा सविस्तर तपशील. दुबईहून तस्करी करून आणलेले सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा प्रकारे पकडल्या गेल्या आणि शौचालयात माल लपवण्याचे कारस्थान कसे उघड झाले.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (Custom Department) १ आणि २ मे रोजी तस्करीविरोधात एक अत्यंत मोठी मोहीम राबवण्यात आली आहे. विमानतळ आयुक्तालयाच्या सीमाशुल्क विभाग-३ च्या सतर्क अधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीसाठी विमानातील शौचालयांचा वापर करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दुबईहून येणाऱ्या काही प्रवाशांच्या हालचालींवर अधिकारी आधीपासूनच नजर ठेवून होते. काही संशयास्पद प्रवाशांची ओळख पटवून विमानतळावर सापळा रचण्यात आला होता. या तपासादरम्यान सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका विमानाची तांत्रिक झडती घेण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या मागील बाजूस असलेल्या दोन शौचालयांची तपासणी केली. यात कमोडच्या आतल्या भागात चॉकलेटी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली ८ पाकिटे अत्यंत चालाखीने चिकटवून ठेवल्याचे आढळले. या पाकिटांमध्ये सोने आणि इतर प्रतिबंधित वस्तू लपवण्यात आल्या होत्या.
तसेच दुबईहून आलेल्या एमिरेट्सच्या फ्लाईटमधून उतरलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या सामानाची आणि शारीरिक झडती घेतली असता त्यांच्याकडून ८४.३७ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, हाय-एंड सौंदर्यप्रसाधने आणि मोठ्या प्रमाणात विदेशी सिगारेट्सचे साठे सापडले. त्यासोबतच स्पाईसजेटच्या विमानातून आलेल्या एका प्रवाशाची तपासणी केली असता, त्याच्याकडे ६९५ ग्रॅम कच्चे सोने (२४-कॅरेट) सापडले. या सोन्याची बाजारपेठेतील किंमत अंदाजे ९५.३२ लाख रुपये आहे. हे सोने त्याने कपड्यांमध्ये आणि शरीरावर लपवून आणले होते.
यावेळी तस्करांनी अवलंबलेली पद्धत पाहून अधिकारीही थक्क झाले. विमानातील कर्मचाऱ्यांच्या किंवा प्रवाशांच्या नजरेत पडू नये म्हणून शौचालयातील जागांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी एका आरोपीला सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
नेटवर्कचा शोध सुरू
विमानतळ सुरक्षा यंत्रणांच्या मते, हे एक मोठे स्मगलिंग सिंडिकेट असण्याची शक्यता आहे. हे सोने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मुंबईत कोणाला वितरित केल्या जाणार होत्या? यामागे विदेशी हँडलर्सचा हात आहे का? या दिशेने सीमाशुल्क विभाग आता सखोल चौकशी करत आहे. पुढील तपासासाठी जप्त केलेला सर्व माल सरकारी गोदामात जमा करण्यात आला आहे.