
वडाळा परिसरात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी (CNG) पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बससेवा कोलमडली आहे. रिक्षा, टॅक्सी आणि बससाठी आवश्यक असलेला गॅस न मिळाल्याने ऐन कामाच्या दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कार्यालये आणि शाळांसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सी शोधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वडाळा परिसरातील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य नैसर्गिक वायू पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी (CNG) पुरवठा रविवार दुपारपासून (१६ नोव्हेंबर २०२५) पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई महानगर क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाझर्स (RCF) कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य पाईपलाईनला मोठे नुकसान झाले आहे. वडाळा येथील महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या सिटी गेट स्टेशन (CGS) ला होणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अंदाजे ४० ते ४५ टक्के रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर उतरु शकल्या नाहीत. यामुळे बेस्ट (BEST) बससह सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. यामुळे ऐन कामाच्या दिवशी रिक्षा-टॅक्सींच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे नोकरदार वर्ग आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवासी रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचे चित्र होते.
मुंबईतील जवळपास १३३ सीएनजी पंपांवर पुरवठा कमी दाबाने होत आहे. काही सीएनजी पंपावर पूर्णपणे पुरवठा बंद आहे. मोजक्या पंपांवर सीएनजी भरण्यासाठी खाजगी वाहने आणि टॅक्सींच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सध्या गेल आणि एमजीएल प्रशासन बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. सार्वजनिक वाहतूक आणि उद्योगांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवार दुपारपर्यंत (१८ नोव्हेंबर २०२५) सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. घरगुती पाईपलाईन गॅस (PNG) चा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. त्याला प्राधान्य दिले जाईल, असे एमजीएलने स्पष्ट केले आहे.
यामुळे बाधित झालेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सीएनजी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.