
मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर, मध्य आणि पश्चिम अशा तिन्हीही रेल्वे मार्गावर आज (१५ जून) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, तसेच अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा आज मेगाखोळंबा होणार आहे.
मुंबईत आज रविवार १५ जून रोजी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर देखभालीसाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामुळे लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. रेल्वे मार्ग, सिग्नलिंग प्रणाली आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हे ब्लॉक्स घेण्यात येत आहेत. या मेगाब्लॉकमुळे अनेक नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व उपनगरीय सेवा काही मिनिटे उशिराने असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी शक्यतो पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पश्चिम रेल्वेवर आज सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर या स्थानकांवर थांबणार नाहीत.
तसेच हार्बर लाईनवरील विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांसाठी सेवा नियमितपणे सुरू राहतील. काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील, तर बोरिवली आणि अंधेरी येथून सुटणाऱ्या काही गाड्या हार्बर लाईनवरून गोरेगावपर्यंत धावणार आहेत.
मध्य रेल्वेवरही आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडून विद्याविहारला जाणाऱ्या धीम्या गाड्या जलद मार्गावरून धावतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार नाहीत. घाटकोपरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे येणाऱ्या गाड्या सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ या वेळेत जलद मार्गावर धावतील. या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या ठिकाणी थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ०४:०५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत कोणत्याही गाड्या धावणार नाहीत. सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर गाड्याही धावणार नाहीत. पनवेलहून ठाण्याकडे सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंतच्या गाड्या रद्द असतील. तसेच ठाण्याहून पनवेलकडे सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंतच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सहून आणि वाशी दरम्यान विशेष ट्रेन धावतील. तसेच ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यान ट्रेन उपलब्ध असतील. हार्बर मार्गावरुन वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सामान्यपणे धावतील. या मेगाब्लॉकमुळे होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.