Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! 49 वर्षीय व्यक्तीच्या मोबाईलमध्ये नको ते सापडलं; महाराष्ट्र सायबरकडून अटक, काय घडलं?
Mumbai Crime News: मुंबईत महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली आहे. ४९ वर्षीय व्यक्तीच्या मोबाईलमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २० हजारांहून अधिक फोटो-व्हिडीओ सापडले आहेत.

मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातून महाराष्ट्र सायबरने एका 49 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित 20 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफुद्दीन जमीर उद्दीन मलिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. महाराष्ट्र सायबरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील निगराणी मोहिमेदरम्यान ही बाब उघडकीस आली.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला मालाडमधून अटक करण्यात आली. महाराष्ट्र सायबरकडून इंटरनेटवरील विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सातत्याने निगराणी ठेवली जाते. याच प्रक्रियेदरम्यान संशयास्पद डिजिटल सामग्रीच्या अनुषंगाने आरोपीची माहिती तपास यंत्रणेला मिळाली. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. या तपासातून सैफुद्दीन मलिक याची ओळख पटली.
पोलिसांनी मालाड पश्चिम परिसरात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक केली. आरोपीच्या मोबाईलची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये बाल लैंगिक शोषणाशी संबंधित २० हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडीओ आढळल्याची माहिती महाराष्ट्र सायबरकडून देण्यात आली आहे. या डिजिटल सामग्रीचे नेमके स्वरूप, त्याचा स्रोत आणि आरोपीचा त्यामागील सहभाग याबाबत आता सखोल तपास सुरू आहे.
आरोपीने हे फोटो आणि व्हिडीओ नेमके कुठून डाउनलोड केले? त्याने ही सामग्री स्वतःपुरतीच मर्यादित ठेवली होती की इतर व्यक्तींनाही पाठवली होती? तसेच ही सामग्री कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आली होती का? या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडीओंची फॉरेन्सिक तपासणीही सुरू आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र सायबरच्या नोडल पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 88/2026 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 294, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम १५ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम 67(B) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का, त्याने इतर व्यक्तींशी अशा प्रकारची सामग्री शेअर केली आहे का आणि या प्रकरणामागे काही मोठे नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही तपास महाराष्ट्र सायबरकडून केला जात आहे.
डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालातून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित अशा प्रकारच्या डिजिटल सामग्रीचे साठवण, प्रसारण किंवा देवाणघेवाण करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अशा सामग्रीविरोधात महाराष्ट्र सायबरकडून अधिक सतर्कतेने निगराणी ठेवली जात आहे.