Canva Layoffs: 6 महिन्यांचा पगार, MacBook अन्…1200 लोकांना काढलं, पण दिलं एवढं की… पुण्यातल्या कर्मचाऱ्याने सगळं सांगितलं!
प्रसिद्ध डिझाइन प्लॅटफॉर्म Canva ने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. मॅटर्निटी लिव्हवर असताना नोकरी गेलेल्या पुण्यातील श्रद्धा यांनी कंपनीकडून मिळणाऱ्या लॅपटॉप आणि इतर सर्व तपशीलाबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

नोकरी जाणं ही कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी अत्यंत धक्कादायक आणि कठीण गोष्ट असते. त्यातही जर व्यक्ती आपल्या आवडत्या कंपनीत काम करत असेल आणि आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर असेल, तर हा त्रास दुप्पट होतो. असंच काहीसं पुण्यातील श्रद्धा यांच्याबाबत घडलं आहे. प्रसिद्ध डिझाइन प्लॅटफॉर्म ‘Canva’ मध्ये काम करणाऱ्या श्रद्धा मॅटर्निटी लिव्हवर असतानाच कंपनीच्या कर्मचारी कपातीत त्यांची नोकरी गेली. मात्र, कामावरून कमी करताना Canva ने कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिलदार सेवरन्स पॅकेजची सध्या आयटी वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर रिस्ट्रक्चर करत Canva या मोठ्या आयटी कंपनीने तब्बल 1,271 म्हणजे जवळपास 22 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीच्या सीईओ मेलनी पर्किन्स यांनी हा 13 वर्षांच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णय असल्याचं मान्य केलं. दरम्यान असं असलं तरी, नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना नव्याने उभं राहता यावं यासाठी Canva कडून कौतुकास्पद सुविधा दिल्या जात आहेत.
काय-काय देणार Canva?
लॅपटॉप अन् सबस्क्रिप्शन: ऑफिसचा MacBook कर्मचाऱ्यांना स्वतःकडे ठेवण्याची परवानगी. सोबतच 1 वर्षासाठी मोफत LinkedIn Premium सबस्क्रिप्शन.
हेल्थ अन् करिअर सपोर्ट: 12 महिन्यांचं हेल्थ कव्हरेज, वन-ऑन-वन करिअर कोचिंग आणि Alumni Talent Directory चा अॅक्सेस.
स्टार्टअपसाठी 10 हजार डॉलर: नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांना 10,000 डॉलरची मदत.
View this post on Instagram
मॅटर्निटी लिव्हवर असूनही दिलासा
या सगळ्यात श्रद्धा यांच्यासाठी सर्वात मोठा दिलासा ठरला तो म्हणजे 6 महिन्यांचा अॅडव्हान्स पगार. सुट्टीवर असल्यामुळे सुरुवातीला शंका होती, मात्र Canva ने मॅटर्निटी लिव्हचा पूर्ण आदर राखत 6 महिन्यांचे वेतन देण्याची पुष्टी केली. 2023 मध्ये Canva मधील नोकरी म्हणजे स्वप्नपूर्ती होती, अशा भावना व्यक्त करत श्रद्धा यांनी, कंपनी सोडण्याचं दुःख असलं, तरी Canva ने दिलेल्या सन्मानजनक वागणुकीचा अभिमान आहे, असं स्पष्ट केलं.
