
मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात ८ मार्च रोजी एका २४ वर्षीय एमडीएस (मास्टर ऑफ डेंटल सर्जरी) विद्यार्थिनी डॉ. स्तुती सोनवणे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या खोलीतून सहा पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे. या नोटमध्ये स्तुतीने आपल्या प्रियकर फुजैल मोहम्मद खान (फजल/फुजैल खान, वय ३१) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने त्याच्याबरोबरच्या नात्याची सुरुवात एका डेटिंग अॅपद्वारे कशी झाली, ते कसे पुढे गेले आणि शेवटी मानसिक त्रासामुळे तिला आयुष्य संपवावे लागले, याची सविस्तर माहिती लिहिली आहे.
नोटमध्ये तिने भावुक शब्दांत म्हटले आहे की,
“तू मला खूप अपमानित केलंस, तुझ्या कठोर शब्दांनीच मला जीव देण्यास भाग पाडलं.”
“मला तुझ्यासोबत राहायचं होतं, पण तू मला ओरडलास, अपमान केलास. मी समोर असते तर तू मला मारलं असतस किंवा हिंसक झाला असतास.”
“तुझ्या वडिलांनी म्हटलं होतं तरुण मुली चांगल्या नसतात, ते बरोबर होतं असं तू म्हणालास.”
“रिलेशनमध्ये असतानाही तुझ्याकडे बंबल अॅप होतं, तरी मी तुला माफ केलं. कदाचित माझ्यात स्वाभिमान नव्हता.”
“तुझ्या वाईट सवयी सिगारेट, दारू सगळं मी सहन केलं. मी मूर्ख होते, पण तुझ्या प्रेमात पडले.”
स्तुतीने आपल्या मित्र-मैत्रिणींचाही उल्लेख केला आहे, जे तिच्या नात्यातील त्रास जाणून “तुला फ्रिजमध्ये पाहायचं नाही” अशा प्रकारे टिप्पणी करत असत. ही सुसाईड नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
पोलिसांनी सुसाईड नोट आणि तिच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे फुजैल मोहम्मद खान याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या (abetment to suicide) आरोपाखाली अटक केली आहे. तो विमा एजंट म्हणून काम करतो आणि लोअर परळ येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना मुंबईतील वैद्यकीय वर्तुळात आणि समाजात मोठ्या प्रमाणात खळबळ उडवणारी ठरली आहे.