
उद्या मुंबईत गणेश विसर्जन सोहळा आहे. अनंत चतुर्दशी असल्याने लाखो मुंबईकर उद्या रस्त्यावर उतरतील. मात्र, त्याआधी एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मागचे दहा दिवस मुंबई पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावली. मुंबई पोलिसांमुळेच मुंबईकरांना गणेशोत्सव कुठल्याही विघ्नाशिवाय आनंदात साजरा करता आला. चिंता करण्यातं कुठलही कारण नव्हतं, कारण पाठिशी मुंबई पोलीस उभे होते. आता उद्या मुंबई पोलिसांनी एक मोठी परीक्षा असेल. म्हणा, मुंबई पोलिसांना दरवर्षी अनंत चतुर्दशीचा दिवस यशस्वीपणे हाताळण्याची सवय आहे. आता उद्या अनंत चतुर्दशी असतानाच बॉम्ब स्फोटाची धमकी देणारा एक मेसेज आला आहे.
मुंबई पोलिसांना एक धमकीचा मेसेज मिळाला आहे. अनंत चतुर्दशीपूर्वी बॉम्बस्फोट होणार असल्याचं या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या संदेशात 34 वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, 400 किलो आरडीएक्समुळे 1 कोटी लोक मृत्युमुखी पडतील असं म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवरची जबाबदारी आणखी वाढली आहे.
किती दहशतवादी घुसल्याचा दावा?
‘लश्कर-ए-जिहादी’ या संघटनेचे 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या असून मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. गणेशोत्सव काळात नेहमीच मुंबई पोलिसांकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मंडपातून बाहेर पडतात. मुंबईत उद्या ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुका निघालेल्या दिसतील.
दोन भागात जास्त गर्दी
मुंबईत उद्या जास्त गर्दी दोन भागात असेल. परळ-लालबाग आणि गिरगाव चौपाटी. सकाळच्यावेळी लालबागमध्ये लाखो गणेशभक्त दर्शनासाठी येतील. जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा, परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती विसर्जनासाठी निघणार आहे. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर असतील.
यंदा परळच्या दोन गणपतींची विशेष चर्चा
गणेशोत्सवात दरवर्षी लालबागची चर्चा असतेच. पण यंदा परळचा महाराजा, परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मंडळांची सुद्धा विशेष चर्चा आहे. या दोन्ही मंडळांनी सुबक गणेशमुर्ती साकारल्या आहेत. लक्ष्मी कॉटेज परळचा लंबोदर यांनी ज्योतिबा रुपातील गणरायाची भव्य मुर्ती साकारली आहे.