मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारची 3 जणांना धडक, VIDEO समोर

मुंबईतील पवई परिसरात जेव्हीएलआर रोडवर भरधाव क्रेटा कारने ३ पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी असून पोलिसांनी १९ वर्षीय चालकाला अटक केली आहे.

मुंबईत पुन्हा हिट अँड रन, भरधाव कारची 3 जणांना धडक, VIDEO समोर
mumbai hit and run
| Updated on: May 04, 2026 | 9:33 AM

मुंबईतील पवई परिसरात शनिवारी रात्री उशिरा हिट अँड रनची घटना घडली आहे. पवईतील आयआयटी मार्केटजवळ जेव्हीएलआर (JVLR) मार्गावर एका भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा आयआयटी मार्केट परिसरातून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार अत्यंत वेगाने जात होती. जेव्हीएलआर मार्गावर महात्मा फुले नगरजवळ चालकाचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार थेट रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये शिरली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसलेले तिघेही पादचारी हवेत उडून काही अंतरावर फेकले गेले. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

एक महिला गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातामध्ये एकूण तीन जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिका बोलावून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एका महिलेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू आहे. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांची टीम अथक प्रयत्न करत आहे.

चालकाचा पळण्याचा प्रयत्न, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हा अपघात घडल्यानंतर घाबरलेला १९ वर्षीय कार चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पवई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास चक्र वेगाने फिरवले. त्यानतंर काही तासांतच आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले. एमआयडीसी झोन १० चे पोलीस उपायुक्त (DCP) दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विरुद्ध हिट-अँड-रन आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय तपासणी आणि सीसीटीव्ही तपास सुरू

दरम्यान पोलिसांनी अपघातातील क्रेटा कार जप्त केली असून चालकाने मद्यप्राशन केले होते का, याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. तसेच, घटनेचा नेमका क्रम आणि कारचा वेग तपासण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत आहेत. रात्रीच्या वेळी जेव्हीएलआरसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us